
बारामती लोकसभेत मिठाचा खडा लागला तर कुणाच्या बापाचेही ऐकणार नाही!
बारामती लोकसभा निवडणुकीत मी माझा उमेदवार देणार आहे. बारामतीकर असा विचार मनात आणतील की विधानसभेला अजितला आणि लोकसभेला तिकडे मत देऊ, असे अजिबात चालणार नाही. खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर जर यदाकदाचित मला मिठाचा खडा लागला (खासदार पराभूत झाला) तर आमदारकीच्या बाबतीत मी वेगळा विचार करेन, मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही, अशा शब्दांत उपुमख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना ‘दम’ भरला.
बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने आयोजित मेळाव्यात अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, कोणी कितीही दावा केला तरी कदाचित कोणी डोळ्यांत पाणी आणतील, भावनिक करतील. बारामतीकरांना ठरवायचे आहे, कामाच्या पाठीशी उभे राहायचे की, भावनिक मुद्दय़ाला पाठिंबा द्यायचा. बारामतीच्या विकासाची गती कायम ठेवायची की त्याला खीळ घालायची, याचा निर्णय बारामतीकरांनीच घ्यायचा आहे. कदाचित तुम्हाला कुणी भावनिक बनविण्याचा प्रयत्न करतील, तिकडे अजितला द्या, इकडे आम्हाला द्या, असे सांगितले जाईल. पण लोकसभा आणि विधानसभा दोन्हीकडे अजित पवार यांच्या विचाराच्या उमेदवारालाच तुम्ही निवडून द्यायचे आहे.
…तर तुमच्या कामांना बांधील नाही
आधी जास्त पाठिंबा दिला तसा यापुढेही द्या, तर पुढे तुमची कामे होतील अन्यथा मी तुमच्या कामांना बांधील नाही. स्पष्टवक्ता म्हणून महाराष्ट्र मला ओळखतो. मला बाकीचे उद्योग आहेत. मी तिकडे काम केले तर मी विमान, हेलिकॉप्टरने फिरेन. मला सकाळी 7 वाजता उठून फिरण्याची गरज नाही. मी जे काम करतो ते कोणीच माय का लाल करू शकत नाही.






























































