उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थकवा व अंगात कणकण यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते होम क्वारंटाइन झाले होते.

अजित पवार यांनीच ट्विट करत याबाबतची माहिती दिली. माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोडय़ाशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रकृती नॉर्मल, विश्रांतीसाठी रुग्णालयात

अजित पवार यांना खोकला होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यांची प्रकृती नॉर्मल आहे, फक्त विश्रांतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाच-सात दिवसांच्या विश्रांतीनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांची कोरोना चाचणी केली असून त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या