
केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांवर लादलेले वादग्रस्त कृषी कायदे जोपर्यंत संसदेत मागे घेतले जात नाहीत तसेच शेतमालाला हमीभाव देण्याची खात्री आणि वीज दुरुस्ती विधेयक मागे घेण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी घेतला आहे. 26 नोव्हेंबर रोजी पेंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, परंतु संसदीय प्रक्रियेद्वारे या घोषणेची अंमलबजावणी होण्याची प्रतीक्षा आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होण्यासाठी यापुढे संघर्ष सुरूच राहील. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 26 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त देशात ठिकठिकाणी शेतकरी एकत्र येऊन आंदोलन करतील. यादरम्यान शहरांमध्ये ट्रक्टर आणि बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे 40 संघटनांचे प्रतिनिधित्व करत असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने निवेदनात म्हटले आहे.
शहीद शेतकऱ्यांच्या नावाने स्मारक उभारा
शेतकरी आंदोलनात आतापर्यंत 670 हून अधिक शेतकरी शहीद झाले आणि पेंद्र सरकारने त्यांच्या बलिदानाची कबुलीही दिली नाही. या शहीदांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि रोजगाराच्या संधी देऊन आधार द्यावा. शहीदांनादेखील संसदेच्या अधिवेशनात श्रद्धांजली वाहायला हवी आणि त्यांच्या नावाने स्मारक उभारले जावे. आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे बिनशर्त मागे घेण्यात यावेत, असे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे.
संसदेच्या अधिवेशनावर धडकणार ट्रॅक्टर रॅली
संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशनादरम्यान दररोज 500 आंदोलकांची ट्ॅरक्टर रॅली संसदेवर काढण्यात येईल. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गने यापुढील काळात आंदोलन चालू ठेवण्यात येणार असल्याचे एसकेएमने म्हटले आहे.
लखीमपूर हिंसाप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रांवर कारवाई करा
शेतकरी आंदोलनच नव्हे, तर लखीमपूर खिरी येथील घटनेवरूनही भाजप खासदार वरुण गांधी आपल्याच पक्षाच्या सरकारला घेरले. लखीमपूरमध्ये 5 शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. ही घटना लोकशाहीवर काळा डाग आहे. याप्रकरणी पेंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीसुद्धा त्यांनी केली.



























































