डिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन

132

सामना प्रतिनिधी । बीड

कायदा आणि सुव्यवस्था राखणे हेच पोलीस खात्याचे पहिले काम, गुन्हेगारी रोखण्यासाठी केवळ थातूर मातूर कारवाया नाही तर प्रत्येक घटने मध्ये डिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन हा आपला मास्टर प्लॅन असणार आहे. सामान्य माणूस जेव्हा अतिशय अडचणीत असतो तेव्हाच तो पोलीस ठाण्याची पायरी चढतो, त्या सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम आमचे आहे, गुन्हेगारी मोडीत काढली जाईल ही वॉर्निंग पुरेशी आहे, असे म्हणत नवीन पोलीस अधिक्षक यांनी आपला इरादा स्पष्ट केला.

बीडचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची नागपूरला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी पोलीस अधिक्षक या पदावर आलेले हर्ष पोद्दार बीडमध्ये दाखल झाले त्यांनी पदभार स्वीकारताच पत्रकार परिषद घेतली. या वेळी बोलताना ते म्हणाले, बीड जिल्हा संवेदनशील आहे हे खरे असले तरी मला नवीन नाही. मी मराठवाड्यात या पूर्वी काम केले आहे. माझे काम गुन्हेगारासाठी वार्निंग असेल. वाहतूक शिस्त पाळली गेली पाहिजे. अपघातात केवळ एकाचा मृत्यू होत नसतो तर मृत्यू मुखी पडलेल्याचे कुटूंब उघड्यावर येते. या पुढे वाहतूक पोलिसांना महसूलसाठी टार्गेट राहणार नाही. ज्या ठिकाणी आवश्यकता असेन तेथेच हेल्मेट बंधनकारक असेल. प्रशासनावरील कोणताही आणि कोणाचाही दबाव आपल्याला चालणार नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करावेच लागेल. कायदा सुव्यवस्था राखण्यालाच प्राधान्य असेल. सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम पोलीस प्रशासन करेल. पोलीस प्रशासन बॉलिवूडचा सेट नाही. म्हणून अधिकाऱ्यांनी चूक केली तर निदर्शनास आणून द्या. मात्र धाडसी काम केले तर सिंघम, दबंग विशेषणे लावू नका. आम्हाला निवडणुका लढायच्या नाहीत. लोकप्रियतेची गरज नाही. सोपवलेले काम प्रामाणिकपणे करणे हेच आमच्या साठी महत्वाचे आहे. कोणता अधिकारी चमकोगिरी करत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. बकरी ईद, गणपती, निवडणुका शांततेत होतील. पोलीस नेहमी सतर्क असतात, असेही सूचक विधान त्यांनी केले. या वेळी बीडचे अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या