
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ बंगल्यातील आपल्या सामानाची बांधाबांध सुरू केली असून दक्षिण मुंबईत घरासाठी शोधाशोध सुरू केली आहे.
सत्तास्थापनेसाठी सर्व प्रयत्न करूनही यश मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्याने फडणवीस यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यांना मलबार हिल येथील मुख्यमंत्र्यांसाठी असणारा ‘वर्षा’ बंगला सोडावा लागणार आहे. त्यामुळे वर्षा बंगल्यावरील सामानाची बांधाबांध आजपासूनच पॅकर्स अँड मुव्हर्स कंपनीकडून सुरू करण्यात आले. दरम्यान, नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेल्या फडणवीस यांच्यावर भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना मुंबईतच राहणे भाग पडणार आहे. विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांना शासकीय निवास मिळणार असले तरी त्याचा वापर कुटुंबासाठी करण्यावर मर्यादा येणार आहेत. शिवाय त्यांची पत्नी अमृता या मुंबईतच एक्सिस बँकेत वरिष्ठ पदावर असून मुलगीही मुंबईतच शिकत आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतच राहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांनी मुंबईतच घरासाठी शोधाशोध सुरू केली आहे.
























































