‘देवपळण’ निमित्ताने वायंगणी गाव रिकामे; तीन दिवसांसाठी ग्रामस्थांनी गाव सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

शेकडो वर्षांची परंपरा जोपासत ‘देवपळण’ निमित्ताने सोमवारी पहाटे वायंगणी गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ गावाच्या वेशीबाहेर निघाले. त्यानंतर दुपारपर्यंत 1800 लोकवस्तीचा संपूर्ण गावही रिकामा झाला. कोकणची एक आगळी वेगळी प्रथा म्हणजे देवपळण-गावपळण. गावपळणीच्या निमित्ताने संपूर्ण गाव दर तीन वर्षांनी तीन दिवस आणि तीन रात्रीसाठी रिकामा करण्यात येतो. या प्रथेप्रमाणे गावकरी वेशीबाहेर वसले आहेत. मालवण तालुक्यातील वायंगणी गावात ही प्रथा शेकडो वर्षांपासून जोपासण्यात येत आहे. वायंगणीलगत असलेल्या आचरा आणि चिंदर या दोन गावात तीन वर्षांनी गावपळण होते. मात्र वायंगणी गावात देवपळण आणि गावपळण अशी प्रथा जोपासली जाते.

प्रथेनुसार ग्रामदेवतेचा कौल घेवूनच या गावपळणीची तारीख निश्चित करण्यात येते. तीन दिवसानंतर गुरुवारी देवाचा कौल घेवूनच पुन्हा गावात प्रवेश केला जाणार आहे. तीन दिवसांसाठी गावच वेशीबाहेर गेल्याने गावातील शाळा, शासकीय कार्यालयाचे कामकाजही ठप्प झाले आहे. घरादारांसह सर्व रस्तेही रिकामे आहेत.

वायंगणीचे ग्रामदैवत रवळनाथ चिंदर सडेवाडी येथे प्रथेप्रमाणे तीन दिवस मुक्कामासाठी जातो. त्यालगतच ग्रामस्थ मंडळीही राहुट्या बांधून तसेच मित्र परिवारांच्या घरात वास्तव्यास जातात. मालवण आचरा मार्गावरील कालावल पुलाखाली किनाऱ्यालगत राहुट्या बांधण्याचे काम सुरू आहे. तीन दिवसांसाठी पुरेल एवढा धान्यसाठा व अन्य साहित्य गोळा करून जणू नव्या घरचीच तयारी करण्यात आली आहे. माणसांबरोबर पाळीव प्राण्यांनाही आपल्या सोबतीला आणले आहे. धार्मिक प्रथा जोपासताना उत्साह व आनंदात तीन दिवस मौजमजाही होते. देवपळणीबाबत पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणेसह सर्व प्रशासकीय यंत्रणाही माहिती देण्यात आली असून त्यांचेही सहकार्य मिळत आहे.