काय सांगता? धनंजय माने येताहेत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाटय़गृहं सुरू झाली आहेत. नाटकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. सध्यातरी लॉकडाऊनच्या आधी रंगभूमीवर असलेली नाटकंच पुन्हा सुरू आहेत. ही नाटकं प्रेक्षकांची गर्दी खेचत आहेत. त्यामुळे नवंकोरं नाटक रंगमंचावर आणू इच्छिणाऱ्यांना हुरुप आलाय. असंच एक नवं नाटक पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘धनंजय माने इथंच राहतात’ असं या नाटकाचं नाव असून त्याच्या तालमीचा शुभारंभ आज बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहातील रिहर्सल हॉलमध्ये झाला. ही प्रिया बेर्डे यांची निर्मिती आहे.

‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे यांचा धनंजय माने इथेच राहतात का? हा संवाद आजही लोकप्रिय आहे. नाटकाच्या शीर्षकाचा चित्रपटाशी तसा काही संबंध नाही. योगायोग म्हणजे प्रिया बेर्डे ‘धनंजय माने इथंच राहतात’ या नाटकाची निर्मिती करत आहेत. त्या स्वत: आणि त्यांची लेक स्वानंदी बेर्डे नाटकात काम करत आहे. राजेश देशपांडे यांच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी असून लेखन नितीन चव्हाण यांचे आहे.

नाटकाबद्दल राजेश देशपांडे म्हणाले, आम्ही या नाटकाची योजना लॉकडाऊनमध्ये आखली होती. नाटकाचे ऑनलाईन वाचन करण्यात येत होते. ऑनलाईन तालमीही केल्या. आता प्रत्यक्ष तालमीला सुरुवात केलेय. यामध्ये धनंजय माने ही व्यक्तिरेखा आहे. नाटकाची कथा सांगत नाही, पण ही संदेश देणारी हलकीफुलकी कॉमेडी आहे. येत्या 19 मार्च रोजी पुण्याला बालगंधर्व येथे ‘धनंजय माने इथंच राहतात’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.