अधिकाऱ्यांनी केले दुर्लक्ष, घरणी प्रकल्पाला धोका

सामना प्रतिनिधी । शिरूर अनंतपाळ

तालुक्यासह चाकूर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या घरणी मध्यम प्रकल्पाच्या कडावर मोठ्या प्रमाणात झाडे झूडपे वाढल्याने कडा कमकुवत होत असून प्रकल्पावरील अधिकारी,कर्मचारी यांकडे लक्षच देत नसल्याने प्रकल्पाला मोठा धोका निर्माण व्हायची संभावना झाली असून घरणी प्रकल्पाची देखभाल रामभरोसे आहे की काय असा प्रश्न तालुकावासियांना पडला आहे. दोन तालुक्याला वरदान ठरलेल्या या घरणी मध्यम प्रकल्पाच्या कडावर आलेली प्रचंड झाडे झुडूपे लवकर साफ करणे फार गरजेचे बनले असताना अधिकारी ,कर्मचारी मात्र शांत बसून असल्याचे चित्र दिसत आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपुर येथे १९६९ साली निर्मिती झालेल्या या प्रकल्पाची क्षमता २५.९६ दशलक्षघनमीटर इतकी आहे.एवढ्या मोठ्या क्षमतेचा तालुक्यातील प्रकल्पIमूळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न या प्रकल्पाच्या निर्मितीने मिटण्यास मदत झाली आहे. याच प्रकल्पावर आटोळा सतरा खेडी व शिवपूर सात खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. तर या प्रकल्पाने तालुक्यातील जवळपास अडीच ते तीन हजाराच्या शेतकऱ्यांना लाभ देणारा प्रकल्प असून यामूळे तालुक्यातील मोठे क्षेत्र सिंचनाखाली आल्याने या प्रकल्पाचे मोठे महत्व आहे.

पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या व दोन तालुक्याला वरदान ठरलेल्या प्रकल्पात मोठा पाणीसाठा झाला आहे.अशात या प्रकल्पाच्या कडा मोठ्या प्रमाणात झाडे झुडूपे वाढली असल्याने या झाडाझूडपाचा परिणाम प्रकल्पाच्या कडावर होत असून हे कडावरील झाडे झुडूपे असेच वाढत राहिले तर पुढे चालून प्रकल्पाची कडा कमकुवत होण्याची शक्यता जाणकाराकडून वर्तवली जात आहे.
दरवर्षी प्रकल्पाच्या देखभाल व दूरूस्तीसाठी व कडा निटनेटके करण्यासाठी हजारो रुपये मिळतात.पण एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकल्पावर खर्च करण्यासाठी शासनाकडून मोठा निधी मिळत असताना ही उन्हाळ्यात प्रकल्पाची डागडूजी का करण्यात येत नाहीत. हे कळण्यापलिकडे असून वेळीच यांकडे लक्ष देणे गरजेचे असताना संबंधित शांत बसून आहेत. तर प्रकल्प डागडूजी व दुरुस्तीचा येणारा निधी जातो कुठे असा प्रश्न तालुकावासियांना पडला असला तरी ऐन पावसाळ्यात प्रकल्प भरत आला असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांचे यांकडे लक्षच नसल्याचे दिसत आहे.

प्रकल्पाखाली गावांना सतर्कतेचा इशारा.
मागील चार दिवसापासून लहान मोठा पाऊस होत असल्याने घरणी प्रकल्प जवळपास भरत आला असून सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता आहे . त्यामुळे सांडव्याचे पाणी घरणी नदीच्या पात्रात जाऊन पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्पाखालील गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने एका पत्रकाद्वारे देण्यात आला आहे