
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह याच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: कल्ला करत कोट्यवधींचा गल्ला जमवला. बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई केलेल्या या चित्रपटाचा आता दुसरा भाग प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मंगळवारी सकाळी रणवीर सिंहने या बहुप्रतिक्षित सीक्वेलचे पहिले पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या अधिकृत नावाची घोषणा केली. ‘धुरंधर 2’ चे नाव ‘धुरंधर – द रिव्हेंज’ (Dhurandhar: The Revenge) असे असणार आहे.
रणवीर सिंह याने ‘धुरंधर’ चित्रपटातील हम्झा किंवा जसकिरत या आपल्या पात्राचा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे पोस्टर इंग्रजीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये रणवीरचा पात्र हम्झा पावसात भिजलेला दिसत असून, त्याचे हात रागाने आवळलेले आहेत. संपूर्ण पोस्टरवर लाल रंगाची छटा असून बॅकग्राउंडला चित्रपटाचे नाव दिसत आहे. या सोबत रणवीरने “अब बिगड़ने का वक्त आ गया है” असे कॅप्शन दिले आहे. यावरून धुरंधरच्या दुसऱ्या भागामध्ये तुफान हाणामारी पाहायला मिळणार असल्याचे दिसते.
रणवीरने चाहत्यांना आणखी एक गुड न्यूज दिली आहे. या चित्रपटाचा टीझर आज दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी प्रदर्शित होणार आहे. तसेच, हा चित्रपट 19 मार्च 2026 जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. या घोषणेसह आणखी एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रणवीर सिंहने टॅग केलेल्या कलाकारांच्या यादीत अक्षय खन्ना याचे नाव आहे. पहिल्या भागात अक्षयने रहमान डकैत ही खलनायकाची भूमिका साकारली होती आणि क्लायमॅक्समध्ये त्याचा मृत्यू झाला होता. आता त्याचे नाव समोर आल्याने त्याची पुन्हा एकदा एन्ट्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेला ‘धुरंधर’ हा चित्रपट गेल्या वर्षी 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह याने हिंदुस्थानी गुप्तहेराची भूमिका साकारली होती. रणवीरसह संजय दत्त, आर. माधवन, अर्जून रामपाल, अक्षय खन्ना, सारा अर्जून यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाने जगभरात 1300 कोटी रुपयांची कमाई केली आहे. नुकताच हा चित्रपट ओटीटीवरही रीलिज झाला होता.

























































