
>>दिलीप जोशी<<
एकदा एका डॉक्टर मित्राच्या डिस्पेन्सरीत बसलो होतो. एक आजीबाई आपल्या नातवाला घेऊन आल्या आणि म्हणाल्या, ‘‘याचे हातपाय बघा. किती पित्त उठल्यागत लाल झालेत.’’ ‘‘खाण्यात काही वेगळा पदार्थ आला का?’’ डॉक्टरांनी विचारलं. ‘‘तसं काही नाही. नेहमीचंच जेवण, पण नेमकं कशाचं वावडं आहे कळेना.’’ डोक्यात लख्खकन प्रकाश पडला. आजीबाई ‘ऍलर्जी’ला ‘वावडं’ म्हणत होत्या. सोपा मराठी शब्द पण पटकन आठवत नव्हता. मग डॉक्टरांनी आणखी काही प्रश्न विचारले आणि औषध देऊन त्यांना दिलासा दिला. ‘त्यांनी किती साध्या भाषेत सांगितलं, पण अगदी चपखल शब्दांत. तरीसुद्धा ‘ऍलर्जी’ हा शब्द आपल्या मनात इतका रुतलाय की इतक्या सहज मराठी प्रतिशब्द सुचू नये याची खंत वाटते.’ ‘खरं आहे’’ डॉक्टर म्हणाले. काही वेळा प्रतिशब्द सुचत नाही, पण अनेकांना आपल्या भाषेतल्या शब्दांचीच ‘ऍलर्जी’ असते. उगाच शिष्टपणा मिरविण्यासाठी पारिभाषिक जडजंबाळ शब्दांचा मारा केला जातो. माझ्या अशा रुग्णांकडून मलाही शिकायला मिळतं.’ ऍलर्जी! गेल्या तीन-चार दशकांत हा शब्द जगभर सर्वांच्या तोंडी रुळलाय. सर्दी का झाली, ऍलर्जी. ताप आला, ऍलर्जी. अनेक रोगांवरचं अर्थातच नेहमी नव्हे, पण अनेकदा उत्तर असतं ऍलर्जी. या आठवडय़ाच्या शेवटी आठवडय़ाच्या अखेरीस ८ तारखेला ‘जागतिक ‘ऍलर्जी प्रतिबंधक दिवस’ आहे. म्हणून ऍलर्जी आठवली. एरवी ‘ऍलर्जी’ची ‘ऍलर्जी’च असलेली बरी. ‘ऍलर्जी’ची ढोबळमानाने व्याख्या म्हणजे एखाद्या पदार्थाविषयी एखादी व्यक्ती अतिसंवेदनशील (हायपरसेन्सिटिव्ह) असणे. ज्या गोष्टींचा सामान्यतः इतरांना त्रास होत नाही अशा (उदा. परागकण, कुठलासा गंध इ.) गोष्टींमुळे दमा उफाळणे, सर्दी होणे, डोकेदुखी किंवा ‘रॅश’ येणे असे व इतर प्रकार ऍलर्जी असणाऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार घडतात. शरीराला त्रास देणाऱ्या आगंतुक पदार्थाची ‘ऍलर्जी’ आली की, शरीरातील प्रतिरक्षके कार्यरत होतात. त्याने ऍलर्जी न शमल्यास औषध घ्यावे लागते. ऍलर्जी कोणाला कशाची असेल सांगता येत नाही. अगदी एखाद्या खाद्यपदार्थापासून ते औषधापर्यंत कशाचीही ऍलर्जी एखाद्याला असू शकते. आमच्या एका ज्येष्ठ पत्रकार मित्राला मोहरी किंवा राईची ऍलर्जी होती. फोडणीतल्या मोहरीचंही त्याला वावडं. ‘‘तू उगाच राईचा पर्वत करतोस’’ असं आम्ही त्याला गमतीने म्हणायचो, पण त्याच्या दृष्टीने ती गंमत नव्हती. तो सहसा कुणाकडे काही खात नसे, पण एकदा जवळच्या नातेवाईकांकडे गेला. त्याला मोहरीची ‘ऍलजीं’ असल्याचं कळेपर्यंत स्वयंपाकघरातल्या चुलीवर फोडणी झाली होती. ‘मोहरी नको’ म्हटल्यावर त्यांनी तेलातली मोहरी वेचून काढली. जेवणं झाली आणि याच्या अंगभर लाल चट्टे (रॅश) उठले. मग त्यांनी ‘‘तरी आम्ही तेलातली मोहरी काढली होती’’ असं म्हटल्यावर उलगडा झाला, पण तोपर्यंत तेलात उतरलेल्या मोहरीच्या अर्काने इंगा दाखवलाच. ‘ऍलर्जी’च्या बाबतीत ‘थोडंसं खाऊन बघ. त्यात काय होतंय…’ वगैरे चालत नाही. माझ्या एका मित्राला सेंट किंवा अत्तराची ऍलर्जी आहे. खरे तर कोणालाही उग्र वासाचेच वावडे आहे. एका लग्नात कोणीतरी भसकन सेंटचा फवारा मारला आणि याचा दमा उफाळला. स्वागतकर्त्यांना आपले काय चुकले तेच कळेना. आता हा मित्र असे समारंभ शक्यतो टाळतो. अमेरिकेत गेलेल्या एका विद्यार्थी मित्राची गोष्ट अशीच. इथे असेपर्यंत त्याला कसलीही ‘ऍलर्जी’ असल्याचे निष्पन्न (डिटेक्ट) झालेलं नव्हतं. तिकडे गेल्यावर फुलांच्या पहिल्याच मोसमात परागकणांच्या (पोलन ग्रेन) मुक्त नैसर्गिक उधळणीने तो इतका हैराण झाला की नाक सुजलं, डोळय़ांतून सारखं पाणी येऊ लागलं. त्यापायी चार दिवस सुट्टीही घ्यावी लागली. मग योग्य उपचार घेऊन ऍलर्जी काबूत आणली गेली.
गेल्या काही वर्षांत पुढारलेल्या वैद्यक शास्त्रात ‘ऍलर्जी’वर बरंच संशोधन झालंय. ‘ऍलर्जी’ची चाचणीही करता येते. त्यावरून आपला एखादा आजार कोणत्या पदार्थाचं आपल्याला ‘वावडं’ असल्यामुळे होतोय ते समजून निश्चित उपाययोजना करता येते. वैद्यक शास्त्राने अनेक सुविधा निर्माण केल्या असल्या तरी जगभरची बहुतेक माणसे ज्या विविध प्रकारच्या प्रदूषणाने भरलेल्या वातावरणात वावरतायत त्यांना कसली ना कसली ऍलर्जी असण्याची शक्यता असतेच. त्याबद्दलची शहानिशा योग्य वेळीच डॉक्टरांकडून करून घ्यायला हवी. काही जणांची काही गोष्टींबद्दलची ऍलर्जी औषधं घेऊन किंवा निसर्गतःच जाते, पण ऍलर्जी होते तेव्हा माणूस कमालीचा बेचैन होतो. अशा वेळी ऍलर्जी झालेल्याच्या जवळच्या माणसांनीही त्याची काळजी घ्यायला हवी. ऍलर्जी भयंकर स्वरूप क्वचितच धारण करते, पण अस्वस्थ मात्र करून सोडते. तेवढं वावडं दूर करण्याचं औषध गवसलं की, मग एकदम बरं वाटतं. पदार्थांची ऍलर्जी, त्याचे दुष्परिणाम आणि उपचार याविषयी जनजागृती व्हावी म्हणून जागतिक ऍलर्जी प्रतिबंधक दिवस किंवा सप्ताह (एप्रिलमध्ये) पाळण्यात येतो. ऍलर्जी निर्माण करणारी मानवनिर्मित कारणं तरी आपण सारे मिळून प्रयत्नपूर्वक दूर करू शकतो. त्यासाठी ‘ऍलर्जी’ समजून घ्यायला हवी. आणि आणखी एक – पदार्थांची, शरीरस्वास्थ्य बिघडवणारी ऍलर्जी एकवेळ दूर करता येईल, पण मनामनांत, माणसामाणसांत प्रसंगी निर्माण होणाऱ्या ‘ऍलर्जी’चं काय? चार गोड शब्दांचा आणि समजदारीचा ‘डोस’च त्यावर उपयुक्त




























































