
खेळपट्टीवर ठाण मांडून उभे रहा. नेहमी पूर्ण षटके खेळण्याचा प्रयत्न करा. आपल्या वाटय़ाची निर्धारित षटके पूर्ण होण्याआधीच आपण सर्व फलंदाज गमावतो. ती षटके आणि त्यातून मिळणाऱया धावा निर्णायक ठरू शकतात, याची प्रत्येकाला जाणीव असायला हवी, असा सल्ला हिंदुस्थानचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी 14 वर्षाखालील क्रिकेटपटूंना दिला. माहुल येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या 14 वर्षाखालील मुलांच्या एजिस फेडरल इन्शुरन्स कप क्रिकेट स्पर्धेत संजीवनी क्रिकेट अकादमी संघाने अचिव्हर्स क्रिकेट अकादमीवर 72 धावांनी दणदणीत विजय मिळवत या स्पर्धेत अजिंक्यपदाचा मान मिळविला. डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन राठोड हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने 10 धावांत निम्मा संघ गारद केला.



























































