लोटे औद्योगिक वसाहतीतील डिवाईन केमिकल्स दुर्घटना, कंपनी मालकासह फॅब्रिकेशन मुकादमांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील डिवाईन केमिकल्स या रासायनिक कारखान्यातील दुर्घटनेबाबत खेड पोलिसांनी कंपनीच्या मालकिणीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 13 नोव्हेंबर रोजी फॅब्रिकेशनचे काम करताना वेल्डिंगची ठिणगी उडून झालेल्या दुर्घटनेत 7 कामगार जबर जखमी झाले होते. यातील एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, तर अन्य 6जण आजही मृत्यूशी झुंज देत आहेत.

डिवाईन केमिकल्स ही कंपनी चामडे आणि औद्योगिक वसाहतीसाठी लागणाऱ्या रसायनाचे उत्पादन घेते. 2007पासून लोटे औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या या कारखान्यात कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घेतली न गेल्याने 13 नोव्हेंबर रोजी ही दुर्घटना घडली. एका कामगाराला आपला जीव गमवावा लागला. रासायनिक कारखान्यात व्यवस्थापनाने हलगर्जीपणा करणे हे कामगारांच्या जीवावर बेतणारे असल्याने खेड पोलिसांनी या प्रकरणी कंपनीची मालकीण श्रीमती अनुराधा मौर्य, त्यांचा मुलगा पियुष मौर्य आणि फॅब्रिकेशन युनिटचा मुकादम दीपक महाडिक या तिघांविरोधात कारखाना चालविताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल केला आहे.

कारखानदारांकडून योग्य ते सुरक्षेचे उपाय केले जात नसल्याने कामगारांच्या जीवावर वारंवार बेतत आहे. कधी कारखान्यात आग लागणे, कधी रिऍक्टरचा स्फोट होणे, कधी वायू गळती होणे, तर कधी उंचावर खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू होणे या घटना घडतच आहेत. 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या जीवघेण्या स्पोटानंतर आता लोट्यातील सर्व कंपन्यांचे ऑडिट करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आगामी काळात येथील कारखान्याचे ऑडिटदेखील होईल, मात्र ऑडिट करून येथे होणाऱ्या अपघातांना आळा बसणार आहे का? असा प्रश्न कारखान्यातील कामगार विचारत आहेत.