दिव्यांगांसाठी दिवाळी अंक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>ज्योत्स्ना गाडगीळ

दिवाळी आपण सगळय़ांनीच साजरी केली. आवडीनुसार, ऐपतीनुसार, दिवाळी अंकही विकत घेतले. असाच पहिलावहिला दिव्यांगांचा दिवाळी अंकही यंदा प्रकाशित झाला आहे.

यंदा साहित्यिक फराळ महाग झालाय म्हणे! पण काय करणार, ‘हौसेला मोल नाही’ असे म्हणत साहित्य रसिक दिवाळी अंकांचा फडशा पाडणार हे नक्की! या मेजवानीत दिव्यांगही वंचित राहू नयेत, अशा विचाराने भरत जोशी यांनी तयार केला, दिव्यांगांसाठी पहिला वहिला दिवाळी अंक! तोही महाग नाही, तर केवळ 25 रुपयांत!

दृष्टी नाही, तरी वाचनाची आवड असणारे अनेक दिव्यांग आपल्या परिचयात असतात. दिवाळी भेट म्हणून हा संच आपण त्यांना दिला, तर त्यांचा आनंद निश्चितच द्विगुणित होईल. संविधानाच्या कलम 129 आणि 130 अनुसार दिवाळी अंकांचा संच आपण विकत आणून पोस्टाकडे सुपूर्द केल्यास ते साहित्य अंध शाळांना, महाविद्यालयांना टपालखर्चाशिवाय पाठवता येते. मग साहित्यदानाची ही संधी आपण का दवडावी? ब्रेल लिपीत तयार केलेल्या या दिवाळी अंकात दिव्यांगांसाठी आवश्यक अशा सर्व विषयांना स्पर्श करण्यात आला आहे. जसे की, अंध बांधवांच्या समस्या, त्यांची ज्ञानप्रकाशाकडे झेप, अंधत्वावर मात, मानसिक शक्तीचा विकास इ. गोष्टी सोदाहरण मांडल्या आहेत. शासकीय अंध विद्यालयाचे  सेवानिवृत्त अधिक्षक  काशीराम मोकासरे सर आणि शिक्षीका माया पारेख यांचे विशेष लेख आणि कविता अंकात समाविष्ट केल्या आहेत. दिवाळीचा आनंद घेत असताना अंध बांधवांनी फटाक्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा, याचीही माहिती दिली आहे.  एवढेच नाही, तर इतर दिवाळी अंकांप्रमाणे खाद्यपदार्थांच्या पाककृतीही दिल्या आहेत. त्यामुळे दिव्यांगांसाठी हा परिपूर्ण साहित्य फराळ ठरणार आहे.

‘दिव्यांगांसाठी दिवाळी अंक’ या अनोख्या संकल्पनेबद्दल विचारले असता संपादक, संकलक आणि निर्माते भरत जोशी सांगतात, ‘मी जवळपास 25 वर्षे सर्पमित्र म्हणून काम करत आहे. डोळस लोकांसाठी हे काम करत असताना एकदा अंध शेतकऱ्याशी माझी गाठ पडली आणि त्याच्यामुळे दिव्यांगांसाठीही सर्पप्रशिक्षण देणे किती महत्त्वाचे आहे, याची मला जाणीव झाली. त्याचबरोबरीने मी प्रयत्नपूर्वक ‘ब्रेल लिपी’ शिकलो आणि कालांतराने दिव्यांगांबरोबर काम करत असताना आलेल्या अनुभवातून त्यांना उपयोगी पडेल अशी साहित्य निर्मिती केली.’ भरत जोशी 25 वर्षांपासून ब्रेल लिपीत पुस्तके लिहित आहेत. ‘सर्पस्पर्श’ या पुस्तकात सर्पदंश झाल्यावर केले जाणारे प्राथमिक उपचार, ‘आपत्कालीन व्यवस्थापन’ या पुस्तकात आग, बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ल्यात अंधबांधवांनी करावयाचे स्व-संरक्षण तसेच ‘एके-47’ रायफलची माहिती पुस्तकात दिली आहे. तर ‘योगस्पर्श’ पुस्तकात योगासनांची माहिती आणि ‘हरित पर्यावरण दर्शन’ या पुस्तकात पर्यावरणाचे महत्त्व दिले आहे. हा सगळा अनुभव गाठीशी बांधून जोशी यांनी दिवाळी अंक साकारला आहे. त्यात मनोरंजनाबरोबरच अंधांसाठी बस, ट्रेन आणि इतर सामाजिक सुविधांची एकगठ्ठी माहितीही दिली आहे. त्यामुळे हा अंक संग्रही ठेवण्यासारखा झाला आहे. अंकासाठी भारत जोशी  9221580888 यांना संपर्क साधावा.