बंदाघाटवर हजारो रसिकांच्या उपस्थितीत ‘दिवाळी पहाट’

370
diwali-pahat-image

सामना प्रतिनिधी । नांदेड

जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, गुरुद्वारा बोर्ड, वाघाळा शहर मनपा व सांस्कृतिक समिती नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेडच्या गोदावरी नदीच्या रम्य तीरावर बंदाघाट येथे दरवर्षी घेतला जाणाऱ्या “दिवाळी पहाट” ला आज रसिकांच्या उस्फुर्त प्रतिसादात प्रारंभ झाला. हा कार्यक्रम यावर्षी 8 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

गेल्या काही वर्षापासून बंदाघाटवरील या रम्य “दिवाळी पहाट”ची किर्ती दूरवर पसरली आहे. त्यामुळे नांदेड शहरातूनच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील रसिक मंडळी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने जमतात. आतापर्यंत नांदेडच्या “दिवाळी पहाट” या कार्यक्रमात राहुल देशपांडे, राजा काळे, हेमा उपासनी, अनुजा वर्तक, अरविंद पिंगळे, त्यागराज खाडीलकर, आरती दीक्षित, पं. ब्रजेश्वर मुखर्जी या दिग्गज कलावतांनी या कार्यक्रमात हजेरी लावलेली आहे.

आज सकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डी. पी. सावंत, आमदार हेमंत पाटील, आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, महापौर शीला भवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काकडे यांच्या उपस्थित करण्यात आले.

“गौरव महाराष्ट्राचा” या मालिकेतील विजेती महागायिका सौ. धनश्री (देव) देशपांडे हिच्या संघाची “स्वर दिवाळी” ही सुगम संगीताची सुरेल मैफील सादर झाली. याच कार्यक्रमात झी सारेगामाचा अंतिम विजेता मयुर सुकळे व उपविजेता अक्षय घाणेकर यांनी देखील भावगीते, नाट्यगीते, चित्रपटगीते सादर केली. या कार्यक्रमाचे सुरेख निवेदन सुप्रसिद्ध निवेदक डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, लेखाधिकारी तथा समन्वयक निलकंठ पाचंगे, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. वाधवाजी तसेच महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी तसेच प्रसार माध्यम सांभाळणारे प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, पत्रकार विजय जोशी, स्वयंवर प्रतिष्ठानचे सुनिल नेरलकर, रत्नाकर अपस्तंभ आनंदी विकास, हर्षद शहा, वसंत मैय्या, उमाकांत जोशी, सरेश जोंधळे, विजय होकर्णे, लक्ष्मण संगेवार, बापू दासरी, विजय बंडेवार, गिरीश देशमुख आणि ॲअँड. गजानन पिंपरखेडे आदी परिश्रम घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या