धरणातील आरक्षित पाणी

26

>>ज्ञानेश्वर भि. गावडे<<

मुंबई आणि मुंबईच्या आसपासची छोटी मोठी शहरे झपाटय़ाने वाढत आहेत. वाढत्या वस्तीला पाण्याचा पुरेसा पुरवठा व्हावा म्हणून लहानमोठय़ा नद्यांवर धरणे बांधावी लागतात. पूर्वापार नैसर्गिक व्यवस्थेमुळे याच नद्यांमुळे तेथील लोकांना वापरायला आणि शेतीला पाणी मिळते; परंतु धरणे बांधली जातात आणि त्यातील साचणारे पाणी वाढलेल्या नागरी वस्तीकडे त्या प्रमाणात वळविले जाते. परिणामी, मूळच्या या लोकांच्या पाणीपुरवठय़ावर प्रतिकूल परिणाम होतोच, त्याचबरोबर त्यांच्या शेतीसाठी असलेल्या पाणीपुरवठय़ावरही विपरीत परिणाम होतो. मीरा-भाईंदर या शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून सूर्या प्रकल्प योजनेद्वारे तेथील नदीवर धामणी गावाजवळ धरण बांधलेले आहे. नागरी वस्तीला पिण्याचे पाणी कमी पडू नये म्हणून या धरणाचे पाणी आरक्षित केले आहे. त्यामुळे तेथील गावातील शेतीचे पाणी बंद केले आहे. त्याविरुद्ध तेथील गावकरी संघर्ष करीत आहेत. मुंबई व ठाणे शहराला पाणी व विजेच्या सोयीसाठी शाई धरणाचा बेत होता, परंतु स्थानिक गावांनी त्याला तीक्र विरोध केल्यामुळे सध्या ते धरण लांबणीवर पडले आहे. सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी धरणाच्या जवळच्या गावांवर जे पाणीसंकट येत आहे. तीच परिस्थिती मुंबईच्या परिसरातील ग्रामीण भागावर वाढत्या नागरी वस्तीमुळे येत आहे. कारण स्थानिक शेतकऱ्यांचे पाणी वळविले जाते. त्यामुळे शेती पिकली जात नाही. त्यामुळे त्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या वाटय़ाला वेठबिगारी येते किंवा ऊसतोडणी कामगारांसारखा स्थलांतरित मजुरीचा आश्रय घ्यावा लागतो. धरणातील आरक्षित पाण्यामुळे खेडी ओसाड होऊ नयेत याची काळजी घेणे जरुरी आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या