
क्रिकेटचा सामना सुरू असताना अनेकदा मजेशीर प्रसंग घडतात आणि खेळाडूंसह प्रेक्षकांचेही हसूनहसून पोट दुखू लागते. हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये झालेल्या मालिकेमध्येही जार्वो (Jarvo) नावाच्या एका व्यक्तीने मैदानात घुसून घुडगूस घातला होता. त्यामुळे त्याला पिच इनवेडर हे नाव मिळाले. आता क्रिकेटमधये आणखी एक पिच इनवेटर दिसून आला असून यावेळेस एखाद्या व्यक्तीने नाही तर प्राण्याने मैदानात घुसून सामना थांबवला.
आयर्लंडमध्ये स्थानिक स्पर्धा सुरू आहेत. यात सीएसएनआय (CSNI) आणि ब्रेडी (Bready) या दोन क्लबच्या महिलांचा क्रिकेट सामना सुरू असताना अचानक गळ्यात पट्टा बांधलेला एक कुत्रा मैदानात घुसतो. एवढेच नाही तर तो चेंडू तोंडात घेऊन पळू लागतो. चेंडू मिळवण्यासाठी महिला खेळाडूही त्याच्या मागे धावतात.
सीएसएनआय क्रिकेट क्लबची फलंदाजी सुरू असताना नवव्या षटकादरम्यान हा प्रकार घडतो. अब्बी लेकी ही शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू टोलवते. यानंतर क्षेत्ररक्षक चेंडू उचलते आणि यष्टीरक्षकाकडे फेकते. यष्टीरक्षक फलंदाजाला बाद करण्यासाठी यष्ट्यांकडे थ्रो करते. मात्र याच दरम्यान मैदानात घुसलेला कुत्रा चेंडू तोंडात पकडतो आणि पळू लागतो.
मैदानात उपस्थित एक व्यक्ती धाव घेऊन मैदानात येतो आणि कुत्र्याचा पाठलाग करू लागतो. मात्र कुत्रा नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या फलंदाज ओईफे फिशर जवळ जातो. फिशरही कुत्र्याला हळूवार कुरवाळते. यानंतर कुत्रा चेंडू तोंडातून सोडतो. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Great fielding…by a small furry pitch invader!@ClearSpeaks #AIT20 pic.twitter.com/Oe1cxUANE5
— Ireland Women’s Cricket (@IrishWomensCric) September 11, 2021

























































