
सामना प्रतिनिधी। डोंबिवली
दोन लाखांच्या खंडणीसाठी टोळक्याने मावसभावांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे. खंडणी देण्यासाठी नकार देताच या टोळक्यातील एकाने अपहृत भावांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नसून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला.
डोंबिवली पूर्व दत्तनगरमध्ये राहणारे मंगेश शेलार घराजवळ उभे असताना तानाजी काठे, किनय अय्यर क संजय या आरोपींनी मंगेशला जबदरस्तीने गाडीत बसवून खंबाळपाडा येथे नेले. त्या ठिकाणी ‘मला दोन लाख रुपये दे, नाही तर तुला मुरबाडच्या फार्महाऊसवर नेऊन गोळ्या घालेन’ अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मंगेश यांनी मावसभाऊ सोमनाथ देवकर याला त्या ठिकाणी बोलावले. त्यानंतर अपहरणकर्त्या टोळक्याने या दोघांना बेदम मारहाण करत सोमनाथच्या डोक्यावर बीयरची बाटली फोडली. त्यांना पुन्हा एका गाडीत बसवून मुरबाडच्या सरळगाव येथील फार्महाऊसवर नेले. त्या ठिकाणी दोन लाखांची मागणी करत पुन्हा दांडक्याने मारहाण केली, तर सोमनाथला स्विमिंग पूलमध्ये बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही सोमनाथ याने पैसे देण्याचे कबूल न केल्याने काठे याने सोमनाथच्या दिशेने गोळी झाडली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तानाजी काठे, किनय अय्यर, संजय आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.































































