
वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस दरवाढीचा फटका बसल्यानंतर गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढल्याने जनसामान्यांना महागाईचा बोजा सोसावा लागत आहे. मुंबईत पेट्रोल 8 पैसे तर डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 12 पैशांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईतील पेट्रोलचे दर 80.87 तर डिझेलचे दर 71.43 रुपयांवर पोहोचले आहेत.
दिल्लीत पेट्रोलचा दर 75.25 तर डिझेलचा दर 68.10 रुपये प्रति लिटर इतका आहे. चैन्नईत पेट्रोल 78.20 तर डिझेल 71.98 रुपयांवर पोहोचले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 11 पैशांनी कोसळला आहे. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत कमी झाल्याने कंपन्यांचा खनिज तेल आयातीचा खर्च वाढला आहे. परिणामी पेट्रोलियम कंपन्यांनी ही भाववाढ केली आहे.
विमान प्रवास महागणार
नवीन वर्षात हवाई इंधनाच्या किमतीत 2.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाववाढीमुळे इंधनाचे दर दुसऱयांदा वाढले आहेत. याआधी 1 डिसेंबरला एटीएफच्या दरात 13.88 रुपये लिटरने वाढ झाली होती. या दरवाढीमुळे विमान प्रवास महागणार असून त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.




























































