डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा आळवला ‘कश्मीर राग’, हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची तयारी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ‘कश्मीर राग’ आळवला आहे. कश्मीर प्रश्नावर हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील घडामोडींवर आमची बारीक नजर आहे. गरज पडल्यास या मुद्दय़ावर दोन देशांमध्ये मध्यस्थी करण्यास तयार आहोत, अशी भूमिका ट्रम्प यांनी बुधवारी जाहीर केली.

दावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेदरम्यान ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तत्पूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांपुढे भूमिका मांडली. व्यापाराचा मुद्दा अधिकाधिक महत्त्वाचा बनत चालला आहे. व्यापार आणि सीमा हे चर्चेसाठीचे दोन गंभीर विषय आहेत. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये कश्मीर प्रश्नावर बोलणी करण्यास आम्ही तयार आहोत, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. हिंदुस्थानने जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यापासून ट्रम्प हे वारंवार हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची तयारी दाखवत आहेत.

माय फ्रेंड खान!
ट्रम्प यांनी इम्रान खान यांना ‘माय फ्रेंड’ म्हटले. कश्मीर प्रश्नाबाबत मी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणी करेन, असा शब्द त्यांनी खान यांना दिला. या ठिकाणी मित्रासोबत असणे ही सन्मानाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले. पुढील काही आठवडय़ांतच हिंदुस्थानात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पाकिस्तान दौऱयाबाबत भाष्य टाळले.

आपली प्रतिक्रिया द्या