
गाझा युद्धात शांतता करारासंदर्भात चर्चा सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना ‘इतके नकारात्मक’ होऊ नका असे सांगितले. हमासने ट्रम्प यांच्या गाझा शांतता प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर, ही ‘चांगली बातमी’ देण्यासाठी ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना फोन केला होता.
मात्र, नेतान्याहू यांचा दृष्टिकोन वेगळा होता. ॲक्सिऑसच्या वृत्तानुसार, नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना सांगितले की यात आनंद वाटण्यासारखे काही नाही आणि या पर्यायांना काहीच अर्थ नाही. त्यावर, ट्रम्प यांनी संतापले आणि शिवी हासडली. ‘फ***, तुम्ही नेहमीच इतके नकारात्मक का असता? हा एक विजय असून, त्याचा स्वीकार करा’, असे म्हटल्याची माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, नेतान्याहू यांनी ट्रम्प यांच्या योजनेला हमासने दिलेला प्रतिसाद म्हणजे आनंद देणारा नाही, आहे असे म्हटले. एका इस्रायली अधिकाऱ्याच्या हवाल्याने ॲक्सिऑसने म्हटले आहे की, हमासने ट्रम्प यांच्या प्रस्तावाला पूर्णत: सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे लोकांना वाटू नये यासाठी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे एक निवेदन जारी करावे अशी नेतान्याहू यांची इच्छा होती.
पण यावर ट्रम्प यांचा विचार वेगळा होता. हमास आपला प्रस्ताव पूर्णपणे नाकारेल अशी भीती ट्रम्प यांना होती, त्यामुळे त्यांनी हमासच्या प्रतिसादाला कराराच्या दिशेने टाकलेले सकारात्मक पाऊल मानले. मात्र असे असतानाही नेतान्याहू यांच्या थंड प्रतिसादाने ट्रम्प संतापले. नेतान्याहू यांचा विरोध बाजूला सारून त्यांना युद्ध संपवण्यासाठी राजी करण्याचा ट्रम्प पुरेपूर प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा आहे.
नेतान्याहू यांच्याशी झालेल्या या खासगी संवादानंतर, ट्रम्प यांनी एक निवेदन जारी करून इस्रायलला गाझामधील हवाई हल्ले थांबवण्यास सांगितले. तीन तासांनंतर नेतान्याहू यांनी तसे आदेश दिले.
नंतर, ट्रम्प यांनी ॲक्सिऑसशी बोलताना सांगितले की गाझा शांतता करार ‘जवळपास’ तयार झाला आहे आणि लवकरच तो करार प्रत्यक्षात आणण्यावर जोर दिला जाईल. अधिकारी म्हणाले म्हणाले की ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना सांगितले की ही त्यांच्यासाठी ‘विजयाची संधी’ आहे आणि शेवटी नेतान्याहू तयार झाले, असे सांगण्यात आले. हा सामंजस्य करार त्यांना मान्य करावाच लागेल. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. माझ्यासोबत तुम्हाला मान्य करावेच लागते’, असे ट्रम्प यांनी जोर देऊन सांगितले.