सोनेरी केस, गुलाबी त्वचा अन् वजन 700 किलो; बांगलादेशातील ‘डोनाल्ड ट्रम्प’ रेडा व्हायरल, इराणनेही घेतली मजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियाच्या जगात सध्या एका पांढऱ्याशुभ्र अल्बिनो जातीच्या रेड्याने धुमाकूळ घातला आहे. बांगलादेशातील एका फार्ममधील या 700 किलो वजनाच्या रेड्याची केशरचना थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मिळतीजुळती असल्याने मालकाने त्याचे नाव चक्क ‘डोनाल्ड ट्रम्प’ असे ठेवले आहे. सध्या त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडाली आहे. ईद अल-अजहा अर्थात बकरी ईदच्या दिवशी त्याची कुर्बानी देण्यात येणार आहे.

गुलाबी त्वचा, सोनेरी केस अन् व्हीआयपी ट्रीटमेंट

बांगलादेशात व्हायरल होणारा हा रेडा दुर्मिळ अल्बिनो प्रजातीचा असून त्याची त्वचा सामान्य म्हशींसारखी काळी नसून फिकट गुलाबी रंगाची आहे. सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे त्याच्या कपाळावर असलेले फिकट सोनेरी रंगाचे लांब केस आहेत. या केसांची वन-साईड स्टाईल हुबेहूब डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेअरस्टाईलसारखी दिसते. त्याच्या केसांची ठेवण पाहून त्यांच्या लहान भावाने गमतीने त्याचे नाव ‘डोनाल्ड ट्रम्प’ ठेवले होते, असे त्याचे मालक झियाउद्दीन मृधा यांनी सांगितले. या ट्रम्प रेड्याला गोठ्यात विशेष ट्रीटमेंट दिली जाते. दिवसातून चार वेळा त्याला अंघोळ घातली जाते आणि त्याचे केस विंचरण्यासाठी गुलाबी रंगाचा कंगवा वापरला जातो.

इराणने घेतली मजा

दरम्यान, रशियातील इराणी दूतावासाशी संबंधित काही सोशल मीडिया हँडल्सवरून यावर एक उपरोधिक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. “डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तुलना केल्यामुळे हा बांगलादेशी रेडा प्रचंड नाराज झाला असून त्याने जेवण सोडले आहे आणि त्याची भूक मंदावली आहे, असा टोला या पोस्टमधून लगावण्यात आला आहे.

ईदला होणार कुर्बानी

बांगलादेशात ईदच्या काळात अशा दुर्मिळ आणि अवाढव्य प्राण्यांना मोठी मागणी असते. सोशल मीडिया स्टार बनलेला हा ‘डोनाल्ड ट्रम्प’ रेडा ईदपूर्वीच 550 टका प्रति किलो या दराने एका ग्राहकाला विकला गेला आहे. याबाबत बोलताना त्याचे मालक म्हणाले की, मला या डोनाल्ड ट्रम्पची खूप आठवण येईल. तो स्वभावाने अत्यंत शांत आहे. पण त्याग आणि समर्पण हाच या सणाचा मुख्य संदेश असल्याने त्याची कुर्बानी दिली जाईल.

तुफान, फॅट बॉय आणि नेमयार

विशेष म्हणजे, याच फार्मवर ‘तुफान’, ‘फॅट बॉय’ आणि ब्राझीलच्या फुटबॉलपटूवरून नाव ठेवलेला ‘नेयमार’ नावाचाही एक सोनेरी केसांचा रेडा आहे. इतकेच नव्हे तर, जवळच दुसऱ्या एका फार्मवर एका रागीट आणि धूर्त रेड्याचे नाव इस्रायलचे पंतप्रधान ‘बेंजामिन नेतन्याहू’ देखील ठेवण्यात आले आहे. ‘इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.