
मुंबईत वाट्टेल तिथे डेब्रिज टाकणाऱयांना जरब बसवण्यासाठी पालिका आता महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणार आहे. यामध्ये डेब्रिज टाकताना आढळल्यास संबंधितांवर पोलिसांच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जाणार आहे. तर मुंबईकरांच्या सुविधेसाठी ‘डेब्रिज ऑन कॉल’ असा उपक्रम सुरू केला जाणार असल्याची माहिती घनकचरा विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी दिली.
मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी पालिकेकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये मुंबईतील कचरा कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे. असे असताना काही जणांकडून रात्रीच्या वेळी ठरावीक ठिकाणी डेब्रिजचे डंपर रिकामे करण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहे. ‘सीसीटीव्ही’ नसलेल्या ठिकाणीच अनोळखी वाहनांमधून डेब्रिज टाकले जाते. त्यामुळे पालिकेच्या ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मोहिमे’ला फटका बसत आहे. त्यामुळे आगामी काळात डेब्रिज टाकणाऱयांवर कारवाई करण्यात येईल. यासाठी संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येतील. शिवाय डेब्रिजच्या विल्हेवाटीचा प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अशी राबवणार मोहीम
मुंबईत दररोज सुमारे 800 ते 1200 मेट्रिक टन डेब्रिज जमा होते. प्रश्न सोडवण्यासाठी सोसायटय़ांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. शिवाय रहिवाशांकडील डेब्रिज विल्हेवाटीसाठी जमा केले जाईल. डेब्रिज देण्यासाठी एक संपर्क क्रमांकही कार्यान्वित करण्यात येईल. हा नंबरही सोसायटय़ांमध्ये दिला जाणार आहे.
































































