‘दूधगंगा’ अपहारप्रकरण आरोपींच्या मालमत्ता जप्त करा! दूधगंगा पतसंस्था संघर्ष समितीची मागणी

दूधगंगा पतसंस्थेत 81 कोटी रुपयांचा अपहार करणाऱ्या 21 आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्या मालमत्ता अटॅच करून जप्त कराव्यात, अशी मागणी दूधगंगा पतसंस्था संघर्ष समितीने राज्य सरकारकडे केली आहे.दूधगंगा पतसंस्था संघर्ष समितीचे प्रतिनिधी मोहन लांडगे, कैलास देशमुख, प्रभाकर रहाणे, हेमंत पवार, सहादू शिंदे, सुनील सातपुते, पोपट आगलावे यांच्यासह इतर 30 ते 35 सदस्यांनी ही मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दूधगंगा पतसंस्थेमध्ये झालेल्या अपहारामुळे खातेदार, ठेवीदारांचे मोठे नुकसान झाले आहे. ठेवीदार मेटाकुटीला आले आहेत. मुलांचे शिक्षण, आजारपण, मुला-मुलींची लग्ने व इतर दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. ठेवीच्या स्वरूपात पतसंस्थेमध्ये पैसे ठेवण्यात आले होते. मुदत संपल्या तरी आमचे पैसे परत मिळत नाहीत. त्यामुळे सरकारने यात लक्ष घालून तातडीने कार्यवाही करावी.

संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात विविध मागण्या केल्या आहेत.  2016पूर्वीचे व 2021नंतरचे संपूर्ण ऑडिट व्हावे, जेणेकरून अधिकचा गैरव्यवहार दिसून येईल. खातेदारांच्या रकमा सुरक्षित करून 21 आरोपी कर्जदार व जामीनदार यांच्या मालमत्ता अटॅच करून जप्त कराव्यात, गैरव्यवहार व अपहार मोठा असल्यामुळे चांगल्या तपासयंत्रणांकडून तपास व्हावा, विधानसभेत लक्षवेधी किंवा तारांकित प्रश्न उपस्थित करावा,अशी मागणी केली आहे.