
सामना ऑनलाईन, मुंबई
‘बेस्ट’च्या मरोळ डेपोची नादुरुस्त डबलडेकर बस मरोळला नेताना मेकॅनिक-चालकाने शॉर्टकट मारण्याच्या नादात वेस्टर्न एक्प्रेस हायवे निवडल्याने ही डबलडेकर अवजड वाहतूक रोखणाऱ्या लोखंडी कमानीला आदळून डबलडेकरचे छप्परच उडाल्याची विचित्र घटना बुधवारी मध्यरात्री घडली. ही बस रिकामी असल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बेस्टच्या डबलडेकर बसला नादुरुस्तीमुळे कार्यशाळेत वारंवार न्यावे लागते. अशाच प्रकारे मरोळ आगाराची नादुरुस्त बस कुर्ला डेपोत नेत असताना मेकॅनिक-ड्रायव्हर आनंद विभुते यांनी बुधवारी मध्यरात्री शॉर्टकट मारण्यासाठी अंधेरी-कुर्ला रोडऐवजी पश्चिम द्रुतगती महामार्गाची निवड केली. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक रोखणाऱ्या लोखंडी कमानीला डबलडेकर बसची धडक बसल्याने डबलडेकरचे छप्परच उडाले. यामुळे बसच्या पुढील तीन आसनेही कोलमडून पडली. ही घटना वाकोला ब्रिजजवळ सर्व्हिस रोडवर घडली. मेकॅनिक कम चालकाला केवळ बस चालविण्याचे प्रशिक्षण असले तरी त्यांना रस्ते आणि मुंबईच्या वाहतुकीचे फारसे ज्ञान नसल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी एसटीचा संप असताना बेस्टच्या जादा फेऱ्या चालविण्यात आल्या. त्यावेळीही चुकीचा मार्ग निवडल्याने डबलडेकरचे छत उडाल्याचा प्रकार घडला होता.

































































