
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगर शहरासह संगमनेरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीला गालबोट लागले. नगरमध्ये मिरवणुकीमध्ये जातीयवादी घोषणाबाजी करून दगडफेक करण्यात आल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तख्ती दरवाजा परिसर व तेलीखुंट परिसरात या घटना घडल्या. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, 13 जणांना अटक करण्यात आली. तर, संगमनेर शहरात महिलांची छेडछाड केल्याप्रकरणी 120 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरपीआयच्या आठवले गटाची मिरवणूक रात्री 11 वाजता तेलीखुंट परिसरात आली असताना, अचानक जातीयवादी घोषणाबाजी सुरू झाली. काही क्षणांतच मिरवणुकीच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. यावेळी घटनास्थळी बंदोबस्ताला असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी जमावाच्या दिशेने जाताच त्या समाजकंटकांनी पोलिसांवरही दगडफेक केली. या दगडफेकीत काही युवकांसह पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
पोलिसांनी घटनास्थळावरून शबाब शहानवाज शेख (वय 34), फरहान फैरोज खान (वय 19, रा. मुकुंदनगर), मुजाहिद हुसैन शेख (वय 21, रा. सर्जेपुरा), इरफान शकील शेख (वय 29, रा. तेलीखुंट), शोएब नादीर शेख (वय 33, रा. सर्जेपुरा), आरिफ आसिफ सय्यद (वय 21, रा. मुकुंदनगर), शाकीब अन्सार सय्यद (वय 21, रा. मुकुंदनगर), दानिश शकील सय्यद (वय 22, रा. मुकुंदनगर), तह अनवर खान (वय 21, पाचलिंब गल्ली), अदनान हुसेन शेख (वय 18, रा. कोठला), समी जावेद पठाण (वय 19, रा. मुकुंदनगर) व दोन अल्पवयीन अशा 13 जणांना ताब्यात घेतले. तसेच इतर 50 ते 60 जण पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दगडफेकीमध्ये अविनाश बबन वाकचौरे, सुधीर क्षीरसागर, चेतन प्रभाकर मोहिते, संदीप काशिनाथ घोडके, प्रदीप भगवान सानप आदी पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. सहायक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी फिर्याद दिली आहे.
तख्ती दरवाजा येथे दोन गटांत घोषणाबाजी झाली. याप्रकरणी उमेश दगडू शेरकर यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सुनील मुरलीधर क्षेत्रे, राकेश रवींद्र वाघमारे, मृणाल विलास भिंगारदिवे, आकाश सुधीर सरोदे, सुबोध प्रवीण ढोणे, प्रशांत पाटोळे, सचिन घनश्याम बुंदेले, जयेश माघारे यांच्यासह 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
संगमनेरात 120 जणांवर गुन्हा दाखल
संगमनेर शहरात गुरुवारी सायंकाळी निघालेली मिरवणूक मेनरोडवर येताच एका समाजाचे काही तरुण हिरवे व लाल झेंडे घेऊन मिरवणुकीत घुसले. काहींना धक्काबुक्की करीत महिलांना अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकारामुळे वातावरण तणावग्रस्त बनले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 100 ते 120 जणांविरुद्ध विविध कलमांअन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर दोघांना अटक करण्यात आली आहे. किशोर सुदामराव चव्हाण (रा. दिल्ली नाका, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फिरोज गुलाब बागवान (रा. मोमिनपुरा), अहमद कामर चौधरी, अमन समीन बागवान, हुजेब इकबाल बागवान, सोहेल इकबाल शेख, अल्ला अझिझ शेख, हमजा शेख, साबीर शेख, अरबाज शेख, अब्दुल समद कुरेशी, डॅनियल शेख, आफन शेख, उमेद काझी, मारूफ अस्लम बागवान व इतर 100 ते 120 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




























































