डॉ. मुरकुटे यांचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा; विखे-पाटील, भानुदास मुरकुटे यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीरामपूर पंचायत समितीतील काँग्रेसच्या सदस्य डॉ. वंदना मुरकुटे यांच्या गटनेते पदावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केल्याने त्यांचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालामुळे भाजपा आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, भानुदास मुरकुटे यांना मोठा धक्का बसला आहे.

सन 2017 मध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे डॉ. वंदना मुरकुटे, अरुण पाटील नाईक, विजय शिंदे व संगीता शिंदे असे चार सदस्य, तर मुरकुटे गटाचे चार सदस्य विजयी झाले होते. नंतर काँग्रेसच्या गटनेतेपदी डॉ. मुरकुटे यांची निवड करण्यात आली. सभापती पदासाठी ओबीसी महिला आरक्षण निघाले. डॉ. वंदना मुरकुटे व संगीता शिंदे या दोन काँग्रेस महिला सदस्य पात्र होत्या. निवडीपूर्वी राजकीय समीकरण बदलले. काँग्रेसने सभापतिपदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. वंदना मुरकुटे यांचे नाव घोषित केले. मात्र, सूनबाईंचे नाव सभापतिपदी नको म्हणून माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी आमदार विखे-पाटील यांच्याशी जुळणी केली आणि संगीता नाना शिंदे या सभापती झाल्या.

दरम्यान, गटनेतेपदाला जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या मान्यतेविरुद्ध शिंदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, शिंदे यांची याचिका फेटाळण्यात आली. शिंदे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टाकडे दाद मागितली. यावर सुनावणी होऊन सुप्रीम कोर्टाने शिंदे यांची याचिका फेटाळली. त्यामुळे आता काँग्रेसच्या गटनेत्या डॉ. वंदना मुरकुटे यांचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. वंदना मुरकुटे यांच्या वतीने ऍड. रवींद्र अडसुरे व ऍड. यश सोनवणे यांनी काम पाहिले.