
राजेश देशमाने । बुलढाणा
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात असलेल्या कामगारांची नागपूर येथे जाण्यासाठी होणारी ससेहोलपट आता थांबणार आहे. अमरावती येथे विभागीय कामगार उपयुक्त कार्यालय निर्मिती करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून यासाठी कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी अथक परिश्रम घेतले होते. बुधवारी कामगार विभागाने तत्काळ शासन निर्णयही जाहीर केला आहे.
विदर्भातील ११ जिल्ह्यात असलेल्या लाखो कामगारांसाठी फक्त नागपूर येथे कामगार उपयुक्त कार्यालय निर्माण केले होते. यामुळे अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, वाशीम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यात असलेल्या कामगारांना ३०० ते ४०० किमी अंतर प्रवास करून नागपूर येथे जावे लागत असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. सन २०१३ पासून या विभागातील कामगार संघटनांनी अमरावती येथे कार्यालय सुरु करण्याची सातत्याने मागणी लावून धरली होती. सध्या अमरावती विभागात एकूण ११७६८६ इतके कारखाने व विविध आस्थापना असून कारखान्यात ६०२८२ ,वाणिज्य आस्थापनेत ७९८२७,असंघटीत क्षेत्रात ४३९७९०९ कामगार कार्यरत आहे. कामगार आणि कंपन्या यांना मोठ्या समस्या भेडसावत होत्या.
महिन्याभरापूर्वी कामगार विभागाची सूत्रे हाती घेतलेले मंत्री डॉ. संजय कुटे यांनी अमरावती विभागातील कारखाने व कामगारांची होणारी ससेहोलपट थांबविण्याचा निश्चय केला. त्यानुसार सातत्याने विभागाकडे पाठपुरावा करून अमरावती येथे कामगार उपयुक्त कार्यालय निर्माण करण्यासाठी विविध विभागांची मंजुरी मिळविली. या कार्यालायात कामगार उपयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसह एकूण १० पदे या कार्यालयासाठी मंजूर करण्यात आले आहे. यामुळे अमरावती विभागातील माथाडी कामगार, कामगार मंडळे, बांधकाम कामगार व असंघटीत कामगार मंडळ,सुरक्षा मंडळ आणि घरेलू कामगार मंडळ यांच्या योजना योग्य पद्धतीने अंमल करण्यास मदत होणार आहे.
































































