
सामना प्रतिनिधी। संभाजीनगर
मंगळवारी झालेल्या तुफानी पावसात नाल्यात वाहून गेलेल्या मजूराचा मृतदेह सापडला आहे. भगवान मोरे असे त्याचे नाव आहे. मोरे मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत होता. घरात तो एकटा कमावता होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने मोरे कुटुंब रस्त्यावर आले आहे.
तब्बल बारा दिवस दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी संभाजीनगर व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात जोरदार हजेरी लावली. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी जमा झाले. नाले भरुन वाहू लागल्याने रस्त्यावर कंबरभर पाणी जमा झाले. यामुळे साचलेल्या पाण्यातून मार्ग काढणे लोकांना कठीण झाले होते. जयभवानी नगरातील शिवाजी पुतळ्याकडून मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी साचले होते. मोरे देखील या रस्त्यावर अडकला होता. मार्ग काढत असताना तो पाण्यात पडला व नाल्यात वाहून गेला.
दरम्यान,नाल्यात इसम पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मंगळवारी रात्री ११.०० वाजता मिळाली. त्यानंतर त्यांनी मोरेची शोधाशोध केली मात्र तो सापडला नाही. बुधवारी सकाळी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनच्या नाल्याजवळ मोरेचा मृतदेह सापडला.































































