
सामना प्रतिनिधी । पाटोदा
बीड जिल्ह्यात पाऊस झाला नसल्याने पाटोदा तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी करपून गेली. तर चाऱ्याचीही पाण्याअभावी फारशी वाढ झाली नाही. जनावरांना चारा उपलब्ध कसा करावा, असा पश्न शेतकऱ्यांना पडला आहे. चारा टंचाई वाढत असल्याने शेतकऱ्यांनी पशुधन कवडीमोल भावाने विक्रीस काढले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जामखेड जिल्ह्यातील नेकनुर येथे पशुधन विक्रीस नेण्यात येत आहे. पुढचे 5 -7 महिने काढायचे कसे असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात चाऱ्याची विक्री चढ्या दराने करण्यात आली होती. आता नवीन चारा लावण्यासाठी पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. आँक्टोबर महिन्यापासून तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढतच आहे. तालुक्यातील व शहरातील अनेक विहीर, बोअरवेल यांनी केव्हाच तळ गाठला असल्याने नवीन चाऱ्याच्या पिकाला पाणी द्यायचे कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील चार महसुल मंडळात शासनाने दुष्काळी परिस्थिती असल्याची घोषणा महिनाभरापूर्वीच केली असून अद्याप कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा दुष्काळी उपाययोजना केल्या नाही. शासनाने केवळ दुष्काळाची घोषणा न करता दुष्काळ निवारण करण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दुष्काळग्रस्त भागात शासनाने प्रामुख्याने जनावरांच्या चारा छावण्या तत्काळ सुरू करण्याची गरज आहे. चारा छावण्या तत्काळ सुरू न केल्यास जनावरे कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. चारा टंचाई झाल्याने अनेकजण उसाच्या वाढे जणवारांना चारा म्हणुन खरेदी करीत आहेत. पण आता वाढे पण दहा रुपयाला एक मिळत असल्याने जणवारांची समस्या गंभीर झाली आहे.




























































