364 गाव-वाड्यांना टँकरने पुरवठा, रायगडात बाराशे गावांना बसणार पाणीटंचाईचे चटके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अलिबाग

पावसाळा संपून दोन महिने उलटत नाहीत तोच रायगड जिल्ह्यात आतापासून पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. 1 हजार 231 गाव-वाडय़ांना पाणीटंचाईचे चटके बसणार असून जिल्हा परिषदेने अद्यापि टंचाई निवारण आराखडा तयार केलेला नाही. त्यामुळे प्रशासनाचे नियोजन लांबणीवर पडले असून त्याचा फटका ग्रामीण भागातील रहिवाशांना बसणार आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू झाली असून सध्या 87 गावे व 277 वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.

जिह्यात पाकसाचे प्रमाण चांगले असतानाही योग्य प्रकारे पाण्याची साठवणूक होत नाही. त्यामुळे दरवर्षी जिह्याला पाणीटंचाई समस्येला सामोरे जावे लागत आहे. प्रतिवर्षी पाणीटंचाई आराखडा केला जातो. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जिल्हा परिषदेने 8 कोटी 25 लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला होता. मात्र यंदा हा आराखडा लांबणीवर पडल्याचे दिसत आहे. याचा फायदा टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदारांनाच होत असतो. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे टंचाईग्रस्त गाव व वाडय़ांच्या संख्येत काढ होत आहे.

योजना गेल्या कुठे?
रायगडातील कर्जत, पेण, महाड, पोलादपूर, तळा या तालुक्यांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. शासनाच्या अनेक योजना अर्धवट राहिल्याने तसेच काही योजना भ्रष्टाचाराच्या कचाटय़ात सापडल्याने अर्धवट पडून आहेत. या वर्षी टंचाई आराखडा तयार करायला अजून सुरुवातही न झाल्याने मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे. सरकारच्या योजना गेल्या कुठे, असा सवाल विचारला जात आहे.

येथे होतो टँकरने पाणीपुरवठा
तालुका        गावे     वाडय़ा
कर्जत         06       22
खालापूर      06       14
पेण           26       71
महाड        17       67
पोलादपूर    12       74
उरण        00        02
पनवेल      02        04
खालापूर    06        14
सुधागड     00        01
रोहा         00        02
माणगाव    10        10
श्रीवर्धन     05        07
तळा       03         03