मंडलिकांच्या पराभवामुळे कोल्हापुरात महायुतीत बेबनाव; घाटगे-मुश्रीफ गटातील धुसफूस चव्हाट्यावर

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे तब्बल दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले. त्यांनी मिंधे गटाचे संजय मंडलिक यांचा पराभव केला. त्यातच मंडलिक यांचे होमपीच असलेल्या कागल मतदारसंघातच अनपेक्षित लीड मिळाल्याने महायुतीत बेबनाव निर्माण झाला आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आली आहे.

मंडलिक यांच्या पराभवास आपण जबाबदार नसल्याचे सांगण्यासाठी एकमेकांकडे बोट दाखवत सोशल मीडियातील त्यांचे आरोप-प्रत्यारोप जिह्यात चर्चेचा विषय बनला आहे. दोघांतील धुसफूस हा मंडलिक यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे.

कोल्हापूर जिह्यात कागल विधानसभा मतदारसंघ हा राजकारणातील राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखला जातो. दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे यांच्यानंतर आता हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, समरजीत सिंह घाटगे, माजी आमदार संजय घाटगे हे नेते सध्या कागलच्या राजकारणात सक्रिय आहेत. कागल विधानसभा मतदारसंघात आमदारकीसाठी गेल्या वेळी हसन मुश्रीफ आणि भाजपनेते समरजीत सिंह घाटगे यांच्यात लढत झाली होती. यामध्ये घाटगे यांचा पराभव झाला. त्यानंतर भाजपनेते किरीट सोमय्या यांच्याकडून ‘ईडी’ला पुढे करून मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना जेरीस आणले गेले. यामध्ये घाटगे हेच सूत्रधार असल्याने या दोघांतील राजकीय वैर अधिकच समोर आले. पण पक्षफोडीमुळे राज्यात बदललेल्या परिस्थितीत भाजप, मिंधे गटासह अजित पवार गटातून मुश्रीफ महायुतीत आल्याने कागलमध्ये एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नसल्याचे या लोकसभा निवडणुकीतून दिसून आले.

मंडलिक यांचा बालेकिल्ला असलेल्या कागलमध्ये हसन मुश्रीफ तसेच समरजीत घाटगे असे दिग्गज नेते आहेत. या दोघांमुळे मंडलिक यांना कागलमधून एक लाखांहून अधिक लीड मिळेल, असा दावा केला जात होता. प्रत्यक्षात केवळ बारा ते तेरा हजारपर्यंत मिळालेले लीड मंडलिक यांच्या जिव्हारी लागणारे ठरले आहे. स्वतःचा मंडलिक गट असताना, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपने काय मदत केली, यावर आता उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. आता हे दोन्ही गट एकमेकांवर या पराभवाचे खापर फोडत आहेत. एकमेकांच्या विरोधात रील्स, फोटो व्हायरल होऊ लागले आहेत.

समरजीत घाटगे गटाकडून मुश्रीफांना टार्गेट करत ‘कागलमध्येच महायुतीचा गेम…मुश्रीफ आणि सतेज पाटील जिल्हा बँकेत एकत्र, गोकुळमध्ये एकत्र, कोल्हापूर महापालिकेत एकत्र, जिल्हा परिषदमध्ये एकत्र आणि लोकसभेला आतून दणका…उगाच नाही म्हणत मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…’, असे सतेज पाटील-मुश्रीफ यांच्या मैत्रीचा दाखला देत कागलमध्येच महायुतीचा गेम झाला, असे पोस्टर व्हायरल होऊ लागले आहेत. तसेच ‘मुश्रीफ आणि मंडलिक एकत्र असले की नेहमी मंडलिक कसे पडतात?… आधी गोकुळ आता लोकसभा… सगळं ध्यानात आहे आमच्या…हिशेब करणार आता सुरुवातीपासून…’, अशा पोस्टही व्हायरल होत आहेत.

हसन मुश्रीफ यांच्या गटातील कार्यकर्त्यांकडूनसुद्धा समरजीतसिंह घाटगे यांच्यावर आरोप करण्यात येत असून, ‘राजेंनी राजेंनाच मदत केली’, असे म्हणत मालोजीराजे छत्रपती आणि समरजीत घाटगे यांचा कागलमधील श्रीराम मंदिरातील व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.