
सामना ऑनलाईन, मुंबई
वर्षानुवर्षे वीज कनेक्शनपासून वंचित असलेल्या तब्बल 10 लाख 93 हजार घरांमध्ये महावितरणने केंद्र सरकारच्या सौभाग्य योजने अंतर्गत वीज कनेक्शन दिले आहे. केवळ पाचशे रुपये आकारून ही कनेक्शन दिली आहेत.
सौभाग्य योजने अंतर्गत दिलेल्या या कनेक्शनमुळे राज्यातील प्रत्येक घरात वीज पोहचली असून राज्याचे शंभर टक्के विद्युतीकरण झाल्याचा दावा महावितरणने केला आहे. देशातील प्रत्येक घरात वीज पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने 25 सप्टेंबर 2017 रोजी सौभाग्य योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यातील 10 लाख 93 हजार लाभार्थी कुटुंबाची पात्रता निश्चित केली होती. या पात्र कुटुंबांना 31 डिसेंबर 2018पर्यंत वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्या पार्श्वभूमीवर 10 लाख 67 हजार घरांना महावितरणने पारंपरिक पद्धतीने तर दुर्गम भागात असलेल्या उर्वरित 26 हजार घरांना महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाने सौर ऊर्जा संचाच्या माध्यमातून वीजपुरवठा दिला आहे.




























































