रंगयात्रा – द अ‍ॅस्ट्रॉनॉमर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुष्यंत पाटील
[email protected]

डच चित्रकार योहानेस व्हर्मीर याने चितारलेले ‘द अ‍ॅस्ट्रॉनॉमर’ फक्त एका माणसाचं चित्र नाही, ते माणसाच्या जिज्ञासेचं, विश्वाच्या अनंततेचं आणि ज्ञानाच्या शाश्वत शोधाचं प्रतीक आहे.

कल्पना करा की, सतराव्या शतकातला एक माणूस अभ्यासिकेमध्ये आकाशातल्या ताऱयांच्या अभ्यासात बुडून गेलाय. खिडकीतून मंद प्रकाश आत येतोय. त्याच्या समोर एक मोठा ग्लोब आहे. या ग्लोबवर आकाशातल्या ताऱयांचा नकाशा आहे. त्यानं एक हात हळुवारपणे त्या ग्लोबवर ठेवलाय, जणू काही तो आकाशाला स्पर्श करतोय! डोळे एखाद्या प्रश्नावर स्थिरावलेले. खोलीत फक्त त्याचा श्वास आणि विश्वाची शांतता.

हे दृश्य आहे योहानेस व्हर्मीर या डच चित्रकाराच्या ‘द अ‍ॅस्ट्रॉनॉमर’ या चित्रातलं. इ. स. 1668 मध्ये रेखाटलेलं हे चित्र आज 350 वर्षांनंतरही माणसांना खिळवून ठेवतं. फक्त 51 X 45 सेंटिमीटर आकाराचं, म्हणजे साधारण एखाद्या मध्यम आकाराच्या टीव्हीच्या क्रीनइतकं हे तैलचित्र आज कोटय़वधी रुपयांचं आहे. पण हे चित्र फक्त महाग आहे म्हणून प्रसिद्ध नाही. हे चित्र मौल्यवान झालंय ते चित्रकारानं चित्रात हाताळलेल्या विषयानं. या चित्रातला माणूस आकाशाकडे बघतोय, कुठल्यातरी प्रश्नाचं उत्तर शोधतोय. हे चित्र म्हणजे विज्ञान आणि कलेचा एक अप्रतिम संगम आहे. हे चित्र समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळात जावं लागेल.

सतरावं शतक म्हणजे डच लोकांचा सुवर्णकाळ. सोळाव्या-सतराव्या शतकात हॉलंड हे जगातील सर्वात श्रीमंत, व्यापारी आणि वैज्ञानिक केंद्र बनलं होतं. डच जहाजं जगभर फिरत होती, नवनवीन देशांचा शोध घेत होती आणि व्यापार करत होती. या व्यापारासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती अचूक दिशादर्शन! समुद्राच्या मध्यभागी असताना रस्ता शोधायचा असेल तर खलाशांना आकाशातल्या ताऱ्यांची, ग्रहांची स्थानं अचूक माहीत असणं गरजेचं होतं. त्यामुळे त्या काळात ‘खगोलशास्त्र’ हे केवळ एक शास्त्र नव्हतं, तर ते देशाच्या प्रगतीचा आणि श्रीमंतीचा कणा होतं.

दुसरं म्हणजे तो काळ विज्ञानाच्या क्रांतीचा होता. गॅलिलिओ, न्यूटन यांसारखे वैज्ञानिक जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत होते. जुन्या धार्मिक समजुतींना बाजूला सारून माणूस आता विज्ञानाच्या जोरावर विश्वाचे नियम शोधत होता. या काळात लोकांना विज्ञानाचं प्रचंड आकर्षण होतं. हे चित्र काढण्याचं काम त्याला कुणातरी श्रीमंत व्यापाऱयानं दिलं होतं, असं मानलं जातं. त्या काळात डच समाजात व्यापारी वर्ग खूप श्रीमंत होता. त्यांच्याकडे मसाल्यांचा व्यापार, समुद्री प्रवास यातून भरपूर पैसा येत होता. हे श्रीमंत व्यापारी त्यांच्या घरात सुंदर चित्रं लावायचे, ज्ञानी माणसांचं कौतुक करायचे. अर्थातच खगोलशास्त्रज्ञ मंडळी ज्ञानी लोकांमध्ये यायची. खगोलशास्त्रज्ञांना त्या काळात खूपच मान असायचा. कारण जहाजांना समुद्रात दिशा दाखवायची असेल तर ताऱयांचं ज्ञान लागायचं. थोडक्यात सांगायचं तर खगोलशास्त्रज्ञ म्हणजे त्या काळचा ‘गुगल मॅप’ होता, त्याच्याशिवाय समुद्रातून जाणं अशक्य!

व्हर्मीरनं हे चित्र ‘द जिओग्राफर’ (भूगोलशास्त्रज्ञ) या चित्राच्या जोडीनं काढलं. दोन्ही चित्रांत एकच माणूस आहे. एक आकाशातल्या ताऱयांचा अभ्यास करतो, तर दुसरा जमिनीचा. जणू काही व्हर्मीरला सुचवायचं होतं की, वर आकाश, खाली पृथ्वी या दोन्हींचा शोध घेणं, हे मानवजातीचं ध्येय आहे!

‘द अ‍ॅस्ट्रॉनॉमर’ चित्रामधल्या खगोलशास्त्रज्ञाचा हात ग्लोबवर आहे, पण तो त्याला धरत नाही, फक्त स्पर्श करतोय. माणूस विश्वाला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, पण विश्व इतकं अवाढव्य आहे की ते पूर्णपणे मुठीत येत नाही. हे माणसाच्या मर्यादांचं प्रतीक आहे! टेबलवरचं उघडं पुस्तक हे जिज्ञासेचं प्रतीक आहे. ज्ञान कधीच बंद पुस्तकात नसतं, ते पुस्तक उघडल्यावरच मिळतं. खगोलशास्त्रज्ञाच्या कपडय़ांचा रंग हिरवा आहे. हिरवा रंग नवजीवनाचा, निसर्गाचा, आशेचा रंग आहे. विज्ञानाचा शोध म्हणजे नवीन जीवन, नवीन दृष्टी, हे सांगायला हिरवा रंग वापरलाय. चित्रामध्ये खगोलशास्त्रज्ञ एकटाच आहे. त्याच्यासोबत कुटुंब किंवा एखादा मित्र नाही. फक्त तो आणि विश्व. खऱया शोधकाला एकांत लागतो, हे व्हर्मीरला सांगायचं होतं.

‘द अ‍ॅस्ट्रॉनॉमर’ फक्त एका माणसाचं चित्र नाही, ते माणसाच्या जिज्ञासेचं, विश्वाच्या अनंततेचं आणि ज्ञानाच्या शाश्वत शोधाचं प्रतीक आहे. त्यामुळेच ते आजही प्रचंड लोकप्रिय आहे.