
- द्वारकानाथ संझगिरी
दिवाळीत अनार लावावा आणि त्यातून फुलं बाहेर येण्याऐवजी तो मोठा आवाज करून फुटावा, तसं काल हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान मॅचच्या वेळी झालं. डोळ्यासमोर फुलं दिसण्याऐवजी, कानठळ्या बसल्या.
धक्का पराभवाचा नव्हता. ज्या सहजतेने पाकिस्तानी संघाने हिंदुस्थानी संघाला हरवलं, त्या सहजतेचा होता. एक गोष्ट सिद्ध झाली की, मागचा देदीप्यमान इतिहास बदलायला तीन तास पुरतात. वर्ल्डकपच्या कुठल्याही स्पर्धेत (50 षटपं आणि टी-ट्वेण्टी) हिंदुस्थानी संघ पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत हरला नव्हता. तीन तासांत त्यांनी पठाणी व्याजासकट हिशोब चुकता केला.
‘टॉस हरणं’ हा हिंदुस्थानी संघाच्या पराभवाचा एकमेव मुद्दा नव्हता. त्यामुळे काही तोटे झाले. दव वाढायला लागल्यावर हिंदुस्थानी गोलंदाजांना गोलंदाजी टाकावी लागली. त्यामुळे चेंडू त्यांना नीट ग्रीप करता आला नाही. दवामुळे पाकिस्तानच्या फलंदाजीच्या वेळी पहिल्या 9, 10 षटकानंतर चेंडू बॅटवर किंचित धावत यायला लागला. मंद खेळपट्टी तरतरीत झाल्यासारखी वाटली. सामना अटीतटीचा होऊन आपण हरलो असतो ना तर कदाचित हे कारण देऊन आपण आपलं समाधान करून घेऊ शकलो असतो.
आपलं बरंच चुकलं
पाकिस्तानसाठी अरबी आखात ही त्यांची आता क्रिकेटभूमी आहे. कारण पाकिस्तानमधलं क्रिकेट बंद झाल्यावर ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट तिथेच खेळतात. त्यामुळे खेळपट्टीच्या हातावरची प्रत्येक रेष अन् रेष त्यांच्या ओळखीची आहे. पण आता हिंदुस्थानींसाठीही अगदी ती काही परकी नाहीये. आयपीएल तर आपण तिथेच खेळलो ना? पाकिस्तानने खेळपट्टीप्रमाणे गोलंदाजी निवडली. आपण एक फिरकी गोलंदाज कमी घेऊन खेळलो, पण तेही पराभवाचं कारण नाही.
आपली फलंदाजी आणि गोलंदाजी एकाच वेळी दुय्यम दर्जाची झाली. हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. ते खेळताना असं वाटलं की ते जन्मापासून टी-ट्वेण्टी खेळताहेत. आणि आयपीएल हे त्यांच्या मातीतलं बालक आहे. (खरंतर आयपीएल आता बालक राहिलेलं नाही. ते कधीच वयात येऊन गेलंय.) तीन पाकिस्तानी खेळाडूंनी असामान्य खेळ करून पाकिस्तानला जिंकून दिलं. आणि फक्त दीड हिंदुस्थानी खेळाडूंनी लढायची जिद्द दाखवली.
पाकिस्तानी विजयाचा पाया घातला तो शाहीन आफ्रिदीच्या पहिल्या स्पेलने. त्याने वेगात चेंडू टाकले. खोलवर टप्पा ठेवला. आणि मुख्य म्हणजे चेंडू स्विंग केले. आखातात पाऊस आणि स्विंग या सणासुदीला दिसणाऱ्या गोष्टी असतात. आफ्रिदीसाठी ती ईदचीच रात्र होती. चेंडूच्या स्विंगने गेल्या काही वर्षांत मर्यादित षटकांच्या सामन्यात आपला घात केलाय. चट्कन आठवणारे दोन सामने म्हणजे चॅम्पियनस् ट्रॉफीचा इंग्लंडमधला सामना, जेव्हा पाकिस्तानच्या अमीरने स्विंगने आपली आघाडीची फळी नाचवली होती. आणि मग 2019 च्या विश्वचषकात न्यूझीलंडच्या स्विंग गोलंदाजांनी आपली वरची फळी कापून टाकली होती. आणि आपण हे दोन्ही सामने हरलो. त्यांनी रोहित आणि राहुल यांच्या फलंदाजीचा पूर्ण अभ्यास केला. त्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी टाकली.
पहिले दोन बळी (रोहित शर्मा आणि के एल राहुल) या पाकिस्तानने हिंदुस्थानी फलंदाजीच्या पायात मारलेल्या दोन गोळ्या होत्या. त्या पायात वर्मी घुसल्या. त्या गोळ्या पायात ठेवून धावणं हे हिंदुस्थानी फलंदाजीला पुढे कठीण गेलं. त्या जखमांनी खपली कधी धरलीच नाही. आणि खपली धरतेय असं वाटत असताना पुन्हा ती खपली निघायची. याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे एक हसन सोडला तर प्रत्येक पाकिस्तानी गोलंदाजानं उत्तम गोलंदाजी टाकून हिंदुस्थानी फलंदाजीला जखडून ठेवलं होतं. त्यांना मोठे फटके मारायची संधीही कमी दिली.
पाकिस्तानी क्षेत्ररक्षण हे जगातलं त्यातल्या त्यात कमी कार्यक्षम असं क्षेत्ररक्षण आहे. पण यावेळी त्यांनी आपल्या क्षेत्ररक्षणाची उंची सुद्धा वाढवली. त्यांनी काही उंच झेल अक्षरशः डोक्यावर बर्फ ठेवून घेतले. स्लिप नसताना यष्टिरक्षकाने सूर्यकुमारचा घेतलेला झेल सुद्धा तितकाच बेमिसाल होता.
ज्या पद्धतीने कर्णधार बाबर आणि रिझवानने फलंदाजी केली, त्यासाठी त्यांना सलाम करायला हवा. किंबहुना हिंदुस्थानी तरुण फलंदाजांनी त्यांच्या त्या फलंदाजीचा अभ्यास करायला हवा. आणि चार गोष्टी शिकायला हव्यात. कुठेही घाई नाही. दोघंही सेट झाले. ज्यावेळेला मोठे फटके मिळाले नाहीत, तेव्हा त्यांनी एकेरी, दुहेरी धावा अशा धावल्या की जणू ते निखाऱ्यावरून धावत होते. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेत कसं करता येईल यावर त्यांनी कायम लक्ष पेंद्रित केलं. त्यासाठी पहिली धाव वेगात धावले.आपले पाय हे धावा धावण्यासाठीच आहेत, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
मला एक जुनी मॅच आठवली, अगदी वनडेनं बाळसं धरण्याच्या पूर्वीची. पाकिस्तानमध्ये हिंदुस्थानी संघ खेळत होता. आणि पाकिस्तानला कसोटी जिंकून देताना त्यावेळेला जावेद मियाँदाद आणि असिफ इकबाल यांनी ज्या काही धावा चोरल्या होत्या किंवा ज्या काही धावा धावून काढल्या होत्या, त्या त्याक्षणी माझ्या डोळ्यासमोर आल्या. म्हणजे असं दृश्य आम्ही त्यापूर्वी कधी पाहिलंच नव्हतं. पुढे वनडे, टी 20 नंतर जगाचं रनिंग बेट्विन विकेट सुधारलं.
ते कुठेही इम्प्रोवायझेशनच्या भानगडीत पडले नाहीत. आणि दहा षटकांनंतर चेंडू दवामुळे बॅटवर यायला लागल्यानंतर ते हळूहळू मोठे फटके खेळायला लागले. तेही त्यांनी पुस्तकातले फटके मारले. उगाचच इथे स्कुप कर, रिव्हर स्वीपच्या भानगडीत पड किंवा इम्प्रोवाईज करण्याचा प्रयत्न कर असं काहीही केलं नाही. एक गोष्ट रिझवानने केली की, ज्या बाजूची बाउंड्री जवळ होती त्याठिकाणी खेळताना तो ऑफ स्टंपवर किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर जायचा आणि तो चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न करायचा. आणि हा त्याचा डावपेच यशस्वी ठरला.
बाबरबद्दल काय सांगणार! तो एक क्लासिकल म्हणता येईल असा दर्जेदार फलंदाज आहे. त्याला पाकिस्तानचा विराट कोहली उगाच म्हणत नाहीत. आणि त्याची ऑफची फटकेबाजी तर उत्तम आहेच, पण ऑनलाही आपण तितकेच सहज, सुंदर क्लासिकल फटके मारू शकतो, हे त्याने दाखवलं. कालचा दिवस असा होता की, आपल्या विराट कोहलीला बाबरच्या बुटात पाय ठेवायला आवडलं असतं. दुःखाची बाब अशी होती की त्यांनी एकही झेल दिला नाही आणि आपण सोडला नाही. त्यामुळे पराभवासाठी पुढे करायला ते सुद्धा कारण मिळालं नाही. त्यादिवशी ते आपल्यापेक्षा फार फार उत्तम खेळले, हे कबूल करण्यापलीकडे आपल्याकडे उत्तर नाही.
10 विकेट्सने पराभव हा मानहानीकारकच पराभव आहे, यात काही शंकाच नाही. पण या हिंदुस्थानी संघाची एक खासियत आहे, हा हिंदुस्थानी संघ सुरुवातीला कोसळला, पण त्यानंतर एखाद्या मोठय़ा कारंज्यासारखा उसळतो. हे आपण गेले तीन ते चार वर्षं पाहतोय. ते कसोटीत पाहतोय, ते आपण वनडेत पाहतोय आणि ते आपण टी-ट्वेण्टीत सुद्धा पाहिलंय. हे आपण ऑस्ट्रेलियात पाहिलं, हे आपण हिंदुस्थानात पाहिलं आणि हे आपण इंग्लडमध्ये सुद्धा पाहिलं. त्यामुळे आता अपेक्षा आहे ती उसळण्याची. तो तरी इतिहास बदलायला नको.
एक कोहली आणि अर्धा रिषभ पंत. पंतचे दोन एका हाताने मारलेले षटकार विस्मयचकित करणारे होते. आधुनिक बॅट आणि अफलातून टायमिंगची ती किमया होती. पण फक्त नयनरम्य षटकार सामना जिंकून देत नाहीत. त्यापलीकडे बरंच काही आणि लागतं. स्पिनच्या विरुद्ध दिशेला मारलेला स्वीप नेहमीच धोकादायक असतो, हे त्याला कळत नाही असं नाही, पण ते अजून वळत नाही. त्यामुळे कर्णधार कोहलीची लढत ही एकाकी ठरली.





























































