World Cup 2019 पावसाचे वळ आयसीसीच्या पाठीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
india-vs-new-zealand

>> द्वारकानाथ संझगिरी

हिंदुस्थान-न्यूझीलंड सामना पाण्यात वाहून गेला. सध्याचा हिंदुस्थानी संघाचा फॉर्म पाहता नुकसान हिंदुस्थानचे झाले. ढगाळ वातावरणात सामना झाला असता तर कदाचित न्यूझीलंड तुल्यबळ संघ होऊ शकला असता, कारण ढगाळ वातावरणाचा फायदा उठवणारे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. पण आत्याबाईला मिशा असत्या तर म्हणण्यात अर्थ नाही. गेल्या काही दिवसांत चार सामने पावसात वाहून गेले आहेत. आणि या गोष्टीचे वळ आयसीसीच्या पाठीवर उठणार आहेत. आयसीसीच्या विरोधात शब्द अधिकाधिक कठोर होत जाणार.

अर्थात इंग्लंड आणि पाऊस यांचे नाते मद्रासी आणि इडली-डोसा किंवा विव्ह रिचर्डस आणि उद्दामपणा एवढे जवळचे आहे. पाऊस कधी पडावा याची सूत्रे देवाच्या हातून माणसाने अजून घेतलेली नाहीत. त्यामुळे आयसीसी त्या बाबतीत काहीही करू शकत नाही. इथे दोन दिवसांत दोन महिन्यांचा पाऊस पडला. फाटलेल्या आभाळाला कसे ढिगळ लावणार? 1975-1979, 1983, 1999 मध्ये इथे इंग्लंडमध्ये विश्वचषक व्यवस्थित पार पडले. पावसाने व्यत्यय आणला, पण बेड ऍण्ड बेकफास्ट स्किममध्ये बुकिंग केले नव्हते. त्यामुळे त्या बाबतीत माणूस हतबल आहे आणि आयसीसीत कुणी देव नाही.

पण मग काय उपाय आहे याच्यावर? या क्षणी तरी काही नाही. पर्जन्य राजावर काही कुणाची हुकूमत नाही.

मग काय करायला हवे होते?

ही स्पर्धा जुलै-ऑगस्टमध्ये घेता आली असती का? कारण त्यावेळी पाऊस नसतोच असे नाही, पण सूर्याचे कामाचे दिवस खूप वाढलेले असतात. त्याला रजा फारशी दिली जात नाही. पण त्यावेळी इंग्लंडमध्ये ऍशेस सिरीज आहे. इंग्लंडसाठी ऍशेस सिरीज हे महारुद्र असते. क्रिकेटमधली इतर लघुरुद्र आणि सत्यनारायणाच्या पूजेला फार महत्त्व दिले जात नाही.

मग पुढचा प्रश्न राखीव दिवस ठेवायला नको होता? ‘आदर्शवार’ म्हणून विचार केला तर हो, पण त्यासाठी स्पर्धा आटोपशीर हवी. पूर्वीच्या इथल्या स्पर्धा आटोपशीर होत्या. राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये प्रत्येक देश दुसऱया बरोबर खेळतो. त्यात देश दहा. त्यामुळे ही स्पर्धा दीड महिन्याची झालीय. प्रत्येक मॅचला राखीव दिवस दिला असता तर या स्पर्धेच्या वेळेत यान मंगळावर जाऊन आले असते. प्रत्येक संघ दुसऱयाशी खेळतो तेव्हा प्रत्येकाला पूर्ण संधी मिळते, पण स्पर्धा आयोजित करण्याच्या दृष्टीने ते व्यवहार्य नसते. पण 2007 साली हिंदुस्थानी संघ वेस्ट इंडीजमध्ये प्राथमिक फेरीत बाहेर फेकला गेला आणि हाहाकार माजला. आयसीसीच्या पैशांचा स्रोतच आटला. हिंदुस्थानी संघ नाही म्हणजे प्रेक्षक गायब. पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे पुरस्कर्ते, जाहिरातदार गायब होतात. त्यामुळे हिंदुस्थानी संघ हा किमान बाद फेरीर्पंयत जायला हवा. हा अलिखित नियम झालाय. यावेळी तर हिंदुस्थानचे किमान नऊ सामने किमान होणार त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा विश्वचषक सुदृढ, हे आयसीसीचे आर्थिक गणित आहे.

बरे, पावसाचा अंदाज घेऊन सामना इतरत्र नेणे ही गोष्ट फक्त कल्पनेची भरारी ठरू शकते. त्यामुळे याक्षणी आयसीसी शब्दबाण झेलण्यापलीकडे आणि ‘जारे जारे पावसा, तुला देतो पैसा’ म्हणण्यापलीकडे काही करू शकत नाही. पण पुढे इनडोअर स्टेडियमचा विचार व्हायला हरकत नाही. कदाचित टोरँटोमधल्या स्टेडियमप्रमाणे! त्याला डोम आहे. तिथे मॅचही खेळली गेली होती. अर्थात, खेळपट्टी आणि आऊटफिल्ड जर कृत्रिम असेल तर क्रिकेटमधली गंमत निघून जाईल.

मॅच पाहायला गेल्यावर क्रिकेटऐवजी पावसावर लिहिणं म्हणजे खाद्यपदार्थावर लिहायला हॉटेलात गेल्यावर प्लेटस् आणि भांडय़ावर लिहिण्यासारखं आहे. अत्यंत शांतपणे नॉटिंगहॅमला प्रेक्षक खेळ सुरू होण्याची वाट पाहत होते. पंचांच्या प्रत्येक पाहणीबरोबर आशेचे किरण कमी कमी होत होते. मधेच पाऊस थांबायचा. सूर्यदर्शन होणार असं वाटायचं आणि अचानक पाऊस रिमझिमायचा. जगभरातून हिंदुस्थानी आलेले आहेत. त्यांना फक्त नैराश्याने भरलेलं आकाश दिसत होते. एकाच्या मनोरंजनासाठी मन्या ओकने अशा आकाशावर केलेल्या कवितेची मी एक ओळ ऐकविली. मन्या ओकने लिहिलं होतं, ‘आकाश तर्र होतं आणि पाऊस नवटाक नवटाक पडत होता.’ तर्र आकाशाचा फायदा मात्र दोघांना होत होता. स्टेडियमसमोर एक हिंदुस्थानी रेस्टॉरंट होते ते तुडुंब भरून वाहत होतं आणि बीअरचे स्टॉल्स दुथडी भरून वाहत होते. मला वॉशिंग्टनहून आलेला मिलिंद प्रधानचा ग्रुप भेटला. त्यांचं नाव ‘पगडी पलटण गँग’. प्रत्येकजण पुणेरी पगडीत आहेत. परदेशातून आलेली बरीच मंडळी मँचेस्टरच्या पाकिस्तान विरुद्धच्या मॅचनंतर ते त्यांच्या देशी परतणार आहेत. मॅच न झाल्याने ही सर्व मंडळी निराश होती. मॅच झाली नाही तर तिकिटाचे पैसे परत मिळतात, पण इथे पैसे कुणाला पाहिजे होते? त्यांना अटीतटीचं क्रिकेट हवं होतं. कोहलीचं शतक हवं होतं. बुमराहने न्यूझीलंडच्या फलंदाजांना लेझीम खेळायला लावलेलं पाहायचं होतं. हिंदुस्थानी संघ खिशात दोन गुण टाकून मँचेस्टरला निघालेला पाहायचं होतं. पावसाने ते क्षण लुबाडले. पावसाची लुटालूट आयसीसी फक्त हताशपणे पाहू शकते, पण निदान पुढे भविष्यात तरी या गोष्टीवर विचार होऊन काही तरी मार्ग काढला जावा.

– [email protected]