
अमेरिका-इस्रायल संघर्षादरम्यान इराणला ४.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. इराणच्या गराश प्रदेशात हा भूकंप झाला. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) ने सांगितले की भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ होती. USGS ने म्हटले आहे की भूकंपाचे केंद्र जमिनीखाली १० किलोमीटर होते. अमेरिका, इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर या भूकंपाचा अणुचाचणीशी संबंध आहे का? अशी चर्चा होत आहे.
गराश हे इराणच्या फार्स प्रांतातील एक शहर आहे. ते गराश काउंटीचे केंद्रस्थान आणि दक्षिण इराणमधील लारेस्तान प्रदेशाचा भाग आहे. इराण हा जगातील सर्वात भूकंपीयदृष्ट्या सक्रिय देशांपैकी एक आहे. अरबी प्लेट आणि युरेशियन प्लेटच्या धडकेमुळे तयार झालेला झाग्रोस फोल्ड थ्रस्ट बेल्ट येथे आहे. गराश या बेल्टचा एक भाग आहे. या प्रदेशात ४ ते ५ तीव्रतेचे भूकंप होणे सामान्य बाब आहे.
युद्धादरम्यान झालेल्या या भूकंपाकडे तज्ञ संशयाने पाहत आहेत. इराण आपली अण्वस्त्रशक्ती दाखवण्यासाठी अणुचाचणी करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. युद्ध परिस्थितीमुळे भूकंपाबाबत संशय व्यक्त होत आहे. भूमिगत अणुचाचण्यांमुळे रिश्टर स्केलवर ४.५ पेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सध्या, अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे भूकंप किंवा स्फोटाचा संबंध अणुचाचणीशी जोडला जात आहे.
























































