
सामना प्रतिनिधी । पुणे
‘पीएमपीएल’च्या वतीने आजपासून सुरू केलेल्या ‘ई-बसेस’ प्रवाशांच्या उदंड प्रतिसादामुळे पहिल्याच दिवशी फुल्ल झाल्या. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी पाच ई-बसेस चालविण्यात आल्या. भेकराईनगर-हिंडवडी, भेकराईनगर-शिवाजीनगर, निगडी-भोसरी, निगडी-हिंजवडी मार्गांवर चालविण्यात आलेल्या ई-बसेसना प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार, शालेय मुले, वृद्ध नागरिकांनी ई-बसद्वारे प्रवास करण्यास प्राधान्य दिले होते.
अत्याधुनिक ई-बसद्वारे नागरिकांना प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी टप्प्याटप्प्याने ५०० बसेसची खरेदी करण्यात येणार आहे. पीएमपीएलच्या धोरणानुसार इंधनविरहित बसद्वारे प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी ई-बसेसच्या खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील २५ ई-बसेस शहरातील विविध मार्गांवर चालविण्यात येणार आहेत. त्यानुसार मंगळवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकाहद्दीत ई-बसेसचे संचलन करण्यात आले. वातानुकूलित बसेसद्वारे प्रवास करण्यास नागरिकांनी पसंती दिली होती. पहिल्या टप्प्यात २५पैकी १० ई-बसेसची नोंदणी झाल्यामुळे मंगळवारपासून संचलनात आणल्या होत्या. विविध बस स्थानकांवर ई-बसचा प्रवास अनुभवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नऊ मीटर लांबीच्या असलेल्या ई-बसमध्ये ३२ आसनक्षमता आहे. असे असतानाही प्रवाशांनी बसद्वारे उभे राहून प्रवास करण्यास पसंती दिली होती. त्यामुळे दिवसभरात ई-बसचे संचलन ‘सुपरफास्ट’ झाले होते. दरम्यान, ई-बसेसच्या चार्जिंगसाठी भेकराईनगर आणि निगडी डेपोत सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
ई-बस एका चार्जिंगमध्ये कापते २२५ किलोमीटर अंतर
ई-बसला एकदा चार्जिंग केल्यानंतर २२५ किलोमीटर अंतर पार करते. विनाइंधन आणि कमीत कमी पैशांमध्ये बस चार्ज होत असल्याने महामंडळाला आर्थिक फायदा होणार आहे.
पीएमपीएल प्रशासनाने नागरिकांसाठी उपलब्ध केलेल्या ‘ई-बस’चा प्रवास खूपच सुरक्षित असल्याचे जाणवले. बसमध्ये वातानुकूलित यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, आसनव्यवस्था, पॅनिक बटन, टँकर डिव्हाइस यंत्रणा आहे. तसेच आसनक्षमता कमी असल्याने गर्दी होत नाही. बसचा प्रवास पूर्णपणे प्रदूषणविरहित असल्याने चालक, वाहक, इतर वाहनचालकांना फायदा होणार आहे. -अंकिता खाने, विद्यार्थिनी





























































