इको फ्रेंडली गणपतीची परंपरा

sai

>> फुलोरा टीम

सध्या पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाची तीव्र जाणीव निर्माण झाली असल्याने सध्या इको फ्रेंडली उत्सवाला प्राधान्य दिले जाते. पर्यावरणीय मूल्यांची आठवण करून देणाऱया मृण्मयी गणपतीचे गोव्यात सर्वत्र पूजन होते. त्याचप्रमाणे काही कुटुंबांत पूर्वापार लाकडाचा, कागदाचा, पत्रीचा गणपती पुजण्याची परंपराही दिसून येते.

शेणवी कुटुंबीयांचा कागदी गणपती
खांडेपार येथील शेणवी खांडेपारकर कुटुंबीयांत कागदी गणपती पुजण्याची परंपरा आहे. पूर्वी कागदावरती गणपतीचे चित्र रेखाटून एखाद्या पेटाऱयात चवथीदिवशी पोर्तुगिजांच्या लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने ते पुजण्याची प्रथा होती. कालांतराने कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्ती करण्यात येऊ लागली. सध्या शेणवी खांडेपारकर कुटुंबीयांनी कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्ती बनवण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे.

श्रीगणेश हे खांडेपारकर कुटुंबीयांचे आराध्य दैवत. आज खांडोळ्यात असलेला महागणपती मूळचा दिवाडी बेटावरच्या नावेली गावातला. पोर्तुगिजांनी हिंदूंच्या मंदिरांच्या विध्वंसाचे सत्र कार्यान्वित करताच भाविकांनी गणपतीच्या मूर्तीला तिथून अंत्रूज या सौंदेकरांच्या महालातील खांडेपारला हलवले. हा गणपती शेणवी खांडेपारकर कुटुंबीयांचे कुलदैवत असल्याने त्या मूर्तीचे त्यांच्याकडे नदीच्या पात्रात अथवा विहिरीत विसर्जन केले जात नाही, तर ही मूर्ती सुरक्षित ठिकाणी ठेवली जाते. कागदाच्या लगद्यापासून तयार केलेला गणपती वजनाने हलका असल्याने तो उचलताना विशेष कष्ट होत नाहीत. खांडेपार येथील खांडेपारकर कुटुंबीयांनी ही परंपरा आजच्या काळात जतन केलेली आहे.

शिरोडय़ात कागदावर गणपती रेखाटून पूजा
शिरोडा येथे असलेल्या खांडेपारकर कुटुंबीयांत कागदावरती गणपती आणि पार्वतीचे चित्र रेखाटून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यांच्याकडे खांडेपारसारखी कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती तयार केली जात नसून मूर्तीऐवजी चित्रे रेखाटून पुजली जातात. मोठय़ा उत्साहाने आणि भक्तिभावाने पूर्वापार प्रचलित असलेली ही चांगली प्रथा खांडेपारकर कुटुंबीयांनी शिरोडा येथे आजही चालू ठेवलेली आहे.

वैद्य-नाईक कुटुंबीय पूजतात लाकडी गणपती
वाजे-शिरोडा येथील नाईक कुटुंबीयांचा वनौषधींशी संबंध होता. वैद्य-नाईक कुटुंबीयांत जो लाकडी गणपती पुजला जातो त्याचे सध्या प्रचलित असलेल्या परंपरेद्वारे विसर्जन केले जात नाही. वाजे येथील श्रद्धास्थानाजवळ असलेल्या तळीत केवळ प्रतीकात्मक पद्धतीने विसर्जन केल्यावर ही मूर्ती सुरक्षित ठिकाणी ठेवली जाते. दुसऱया वर्षी ती चतुर्थी येण्यापूर्वी शिरोडा येथील लाला च्यारी यांच्या कुटुंबीयांकडे नेऊन रंगकाम केल्यावर पुजली जाते. वाजेत वैद्य-नाईक कुटुंबीयांत पूर्वापार केवळ एकच लाकडी गणपती पुजला जायचा. सध्या दोन मूर्ती पुजल्या जातात.

काणकोणच्या पत्रीगणेशाची पूजा
काणकोणात सारस्वत प्रभुगावकर कुटुंबात पत्रीचा गणपती पुजण्याची प्रथा आहे. श्रावण-भाद्रपदात निसर्ग प्रसन्न असल्याने रानात बऱया वृक्षवेली, तृणपात्यांची पत्री एकत्रित करून त्यांची पूजा केली जाते. गणपती हा वसुंधरारूपी गौरीमातेचा पुत्र. ही बहुप्रसवा वसुंधरा श्रावण भाद्रपदात निसर्गातले लावण्य मौसमी फळा-फुलांच्या उत्स्फूर्त आविष्काराद्वारे आपल्या कुशीत जोजवत असते. हे लावण्य पत्रीच्या रूपात गणपती म्हणून पुजण्याच्या परंपरेतून प्रभुगावकर पर्यावरणीय संस्कृतीचा वारसा समूर्त करत असतात.