चंद्रकांत पाटील राजकारणातून संन्यास घेत हिमालयात जाणार का- एकनाथ खडसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘कोल्हापूरच्या निवडणुकीत पराभव झाला तर राजकारणातून सन्यास घेत मी हिमालयात जाईल’ अशी प्रतिज्ञा केली होती. याठिकाणी काँग्रेसचा विजय झाल्याने चंद्रकांत पाटील राजकारणातून संन्यास घेत हिमालयात जाणार का? असा प्रश्न सर्व सामन्यांना पडला असल्याचा खोचक टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

कोल्हापूर येथील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे सत्यजित कदम यांचा पराभव करून कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांनी विजय संपादन केला आहे. या विजयाचा जळगाव शहरात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी आनंदोत्सव साजरा केला. त्यावेळी एकनाथ खडसे आणि अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जायचा शब्द फिरवला, असा टोला लगावत पराभवाची जबाबदारी स्वीकारून चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जावे, असा सल्ला खडसे यांनी दिला.

रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्राचे धनुष्य महाविकास आघाडीच्या कामाला आले, तसे हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाची गदासुद्धा महाविकास आघाडीच्या हातात आली. कोल्हापूरकरांनी शाहू महाराजांच्या कृपेने ही गदा भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात मारली. भारतीय जनता पार्टीचा याठिकाणी पराभव झाला. चंद्रकांत पाटलांनी दिलेला शब्द पाळावा. तारीख सांगावी, मी सद्धा त्यांच्यासोबत टाळ घेऊन सोडायला येईल. असा खोचक टोला मिटकरी यांनी लगावला.