खडसे यांना जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोसरी एमआयडीसी येथील भूखंड खरेदी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना गुरुवारी सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. दोन वर्षांपूर्वी अंमलबजावणी संचालनालया (ईडी)ने दाखल केलेल्या आर्थिक अफरातफरीच्या गुह्यात एकनाथ खडसे यांना दोन लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी हा निर्णय दिला. पुणे जिह्यातील भोसरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी)च्या भूखंड खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी केली होती. त्या तक्रारीच्या आधारे बंड गार्डन पोलीस ठाण्यात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याआधारे ईडीने 2021 मध्ये खडसे कुटुंबीयांविरुद्ध आर्थिक अफरातफरीच्या आरोपाखाली ईसीआयआर दाखल केला. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या एकनाथ खडसे यांनी नियमित जामिनासाठी ऍड. मोहन टेकावडे व ऍड. स्वाती टेकावडे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात दाद मागितली होती.