मिंध्यांच्या महायुतीत जागावाटपावरून फटाके, निवडणुकीत शिंदे गटाला जेवढय़ा जागा तेवढय़ाच आम्हाला द्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेच्या जागावाटपावरून मिंध्यांच्या महायुतीत फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाला जेवढय़ा जागा तेवढय़ाच आम्हाला द्या, अशी आक्रमक भूमिका अजितदादा गटाने घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच समसमान जागावाटपाची भूमिका मांडली आहे. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेलेल्या शिंदे गटाकडे जितके आमदार आहेत तितकेच आमदार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे आहेत. त्यामुळे लोकसभेच्या जागावाटपाचे सूत्र ठरवताना शिंदे गटाएवढय़ाच जागा अजित पवार गटालाही मिळायला हव्यात, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, अजितदादा गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही शिंदे गटाला जो न्याय तोच न्याय आम्हालाही मिळावा, अशी भूमिका मांडली आहे.

जानेवारीत अमित शहांसोबत बैठक

लोकसभेच्या जागावाटपाची याच महिन्यात बैठक अपेक्षित होती, मात्र विविध राज्यांतील मंत्रिमंडळ विस्तार, लोकसभेचे अधिवेशन, महाराष्ट्रातले विधानसभेचे अधिवेशन यामुळे आमची बैठक लांबली. जानेवारी महिन्यात भाजप पक्षश्रेष्ठाr अमित शहा यांच्यासोबत बैठक होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आमच्या पक्षाचे नेते मिळून जागावाटप निश्चित करतील, असे प्रफुल पटेल म्हणाले.