
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केल्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कुठेही पिक्चरमध्ये नाहीत. त्यांनी स्वतःच या आंदोलनापासून दूर राहणे पसंत केले की त्यांना श्रेय घेता येऊ नये म्हणून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच एकनाथ शिंदे हे गणपतीचे निमित्त काढून सातारा येथील त्यांच्या दरेगावी निघून गेले. विशेष म्हणजे दरवर्षी ठाण्यातील निवासस्थानी असणारा गणपती यावेळी त्यांनी आपल्या गावी स्थापन केला. गणपतीसाठी ते गावी निघून गेले आणि आंदोलनादरम्यान कुठेही त्यांच्या नावाचा उल्लेखही आला नाही. शिंदे आणि अजित पवार हे दोघेही मराठा समाजाचे आहेत. मराठ्यांना आरक्षण देण्याची शपथ त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाला हात लावून घेतली होती. त्यानंतरही त्यांनी आंदोलनाबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही किंवा जरांगे यांच्याशी चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही. सार्वजनिक कार्यक्रमही टाळले. त्यामुळे ते गेले कुठे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.