
महायुतीतील तीन पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरूच असून, भाजपपाठोपाठ आता अजित पवार गटाने मिंधे गटाला धक्का दिला आहे. महाबळेश्वरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज होऊन त्यांची चुलत मावस बहीण माजी नगरसेविका विमल ओंबळे यांनी प्रभाग क्र. 4 मधील आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन अजित पवार गटामध्ये प्रवेश केला.
एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी सातारा येथील मेळाव्यात आपल्या भगिनी विमल ओंबळे यांच्या निवडणुकीची जबाबदारी कुमार शिंदे यांच्यावर टाकली होती. परंतु दोन दिवसांपूर्वी त्यांनी विमल ओंबळे यांचा पाठिंबा काढला आणि प्रतिस्पर्धी उमेदवार विमल बिरामणे यांना पाठिंबा जाहीर केला. ही बाब ओंबळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली, मात्र त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे विमल ओंबळे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.






























































