‘राफेल’वरील पुस्तकाच्या प्रकाशनावर निवडणूक आयोगाची बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून निवडणूक आयोग प्रत्येक घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहे. याच दरम्यान हिंदुस्थान आणि फ्रान्समध्ये झालेल्या राफेल करारासंबंधी लिहिण्यात आलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशनावर निवडणूक आयोगाने बंदी घादली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी यामागे आदर्श आचारसंहितेचे कारण दिले आहे.

ज्येष्ठ पत्रकार आणि ‘द हिंदू’ या वृत्तपत्र समुहाचे संचालक एन राम यांच्या हस्ते एस विजयन यांनी लिहिलेल्या ‘राफेल : दि स्कॅम दॅट रॉक्ड द नेशन’ या पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन होणार होते. या पुस्तकाचा आधार घेऊन एन राम यांनी अनेकवेळा वृत्तलेख लिहिले आहेत.

प्रकाशकांनी (भारती प्रकाशन) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी एक शाळेशी संपर्क साधला होता, परंतु शाळेने निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आचारसंहिता नियमांचा हवाला देत नकार दिला. यानंतर प्रकाशकांनी आपल्या कार्यालयातच हा सोहळा घेण्याचे ठरवले होते, परंतु निवडणूक आयोगाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले व आचारसंहितेचे कारण देत पुस्तकांचे प्रकाशन रोखले. तसेच पुस्तकांच्या प्रती देखील जप्त केल्या. निवडणूक अधिकाऱ्यांनी या पुस्तकाच्या एकून 142 प्रती जप्त केल्या असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या कारवाईविरोधात भारती प्रकाशन आपल्या वकिलांशी चर्चा करत असून याविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता आहे. भारती प्रकाशनचे संपादक पी.के. राजन यांनी ही कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे. तसेच आम्ही न्यायालयात जाऊ आणि प्रकाशनाचा मार्ग मोकळा करू असेही ते म्हणाले.

राजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रामध्ये आधारित माहितीच्या आधारावर हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. आम्ही याआधी निवडणुकीवर आधारित अनेक पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. पंरतु आताच निवडणूक आयोगाना कारवाई का केली हे कळत नाही, असेही ते म्हणाले.