नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवणं हेच लक्ष्य…जयराम रमेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवणं हेच आमचं लक्ष्य आहे. यामुळे पुढील वर्षी ‘नरेंद्र मोदी’ या मुद्दयावरच निवडणुका लढल्या जाणार असे सूतोवाच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केले आहे. तसेच मोदींना घालवण्यासाठी महाआघाडी स्थापन करणारच असेही त्यांनी ठणकावून सांगितले .एका वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच मोदींचा खोटारडेपणा उघड करण्याचे कामही आम्हाला करायचं आहे असेही ते यावेळी म्हणाले.

या मुलाखतीत रमेश यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी याच्याबदद्लही विचारण्यात आले होते. यावर राहुल अध्यक्ष झाल्यामुळे काँग्रेसमध्ये तरुणांना मोठ्या संधी मिळाल्या. त्यांना मोठी पदे देण्यात आली. यामुळे तरुणांमध्ये जोश आल्याचेही रमेश यांनी सांगितले. तसेच रमेश यांनी नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांवरही मत व्यक्त केले. गोवा व मणीपूरमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने अचूक खेळी खेळत सत्ता स्थापन केली. मोठ्या मनाने जनता दल सेक्युलरला मुख्यमंत्रीपद दिले असेही ते म्हणाले.

तसेच यापुढे भजपविरोधात सगळ्यांनी एकत्र येणं गरजेच आहे. यासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यात महाआघाडीचे प्रयत्न करणार असल्याचे व नितिश कुमार विश्वासार्ह नसल्याने त्यांच्याबरोबर आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले.