इलेक्ट्रिक वाहनधारकांना नो टेन्शन! सोसायट्यांमध्येच होणार चार्जिंग स्टेशन

इलेक्ट्रिक वाहने मोठय़ा संख्येने बाजारात येत असली तरी, त्या प्रमाणात चार्जिंगची सुविधा उपलब्ध नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होते. पण आता त्याची काळजी करण्याची गरज नाही. इलेक्ट्रिक वाहनांसाठी गृहनिर्माण सोसायटय़ांमध्येच चार्जिंग स्टेशन उभारण्याची सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली असून राज्य सरकार लवकरच यासंदर्भातील धोरण आखणार आहे.

वायुप्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला देशात प्रोत्साहन दिले जात आहे. महाराष्ट्रातदेखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला अधिकाधिक चालना मिळावी यासाठी
सुधारित धोरण आखण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत या संबंधीचा आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यंत्र्यांनी शहरी-ग्रामीण भागात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरला गती कशी मिळेल याचा साकल्याने विचार करून यासंदर्भातील सर्वंकष धोरण आखण्यात यावे, असे आदेश दिले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागरी भागात गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात यावी, अशी सूचना केली. तसेच शासकीय पातळीवर इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना सध्या वाहन खरेदीसाठी असलेल्या आर्थिक तरतुदीची मर्यादा लक्षात घेऊन त्यात बदल करणे आवश्यक राहील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

इलेक्ट्रिक वाहन सुधारित धोरण निश्चित करण्यासाठी पर्यावरण विभागाने अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली 22 डिसेंबर 2020 ला समिती स्थापन केली आहे. ही समिती सर्व संबंधित विभागांशी चर्चा करून यासंबंधीचा मसुदा तयार करत आहे.

बैठकीला परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच सुधारित धोरण निश्चितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष आशीषकुमार सिंह, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव महेश पाठक, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱहाड, महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव उपस्थित होते.

वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देणे गरजेचे असून यासाठीचे सर्वंकष सुधारित धोरण निश्चित करावे व लवकरात लवकर ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावे.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या सूचना

वाहनांना लागणारे चार्जिंग स्टेशन्स कुठे आणि कशा पद्धतीने उभारणे आवश्यक आहे, त्यासाठी कोणत्या पायाभूत सुविधा लागणार आहेत याचा आराखडा तयार करावा.

मागणी आणि पुरवठादार यांना द्यावयाची प्रोत्साहने, या क्षेत्रातील गुंतवणूक, शासनात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून हे धोरण निश्चित केले जावे.

सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना कशा पद्धतीने प्रोत्साहन देता येईल याचाही विचार करावा.

आपली प्रतिक्रिया द्या