
सामना प्रतिनिधी । भोकर
ग्राहकांच्या बिलात अफरातफरी करून तब्बल एकवीस लाखाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोन अभियंत्यासह चार लिपिकांवर भोकर पोलिसात बुधवारी न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
वीज वितरण शाखा भोकर मधील कार्यरत कर्मचारी विश्वनाथ रतनबुवा भारती (४८,कार्यकारी अभियंता), बालाजी चिंतामणी पांचाळ (४५,उप कार्यकारी अभियंता), प्रवीण आनंदराव ताडेवाड (३२,लिपिक),श्रीमती सविता विश्वनाथ लाठकर (५९,निवृत्त लेखापाल), संदिप प्रभाकर वांद्रे (४०, लिपिक),अनिल माधवराव फिरंगी (३५, लिपिक) यांनी संगनमत करुन १ जानेवारी २०१६ ते मार्च १८ या कालावधीत शासकीय नौकरीत पदावर असताना ग्राहकांचे आवश्यक कागदपत्रे न घेता वीज जोडणी, वीज ग्राहकांच्या खोट्या व बनावट पावत्या तयार करून व ग्राहकांना खऱ्या असल्याचे भासवून पैशांचा अपहार, चुकीचे वीजबिल नसताना स्वतःच्या फायद्यासाठी बिलातून रक्कम वजा करणे अशा विविध प्रकारे वीज वितरण कंपनीचे तब्बल एकवीस लाख रुपयांची अफरातफरी केल्याचे निर्देशनास आल्यावरून कार्यकारी अभियंता मोहन गोपुलवाड यांच्या फिर्यादीवरून गुरन १९४/१८, कलम ४२०,४०९,४६३, ४६६,४६७, ४७०, ४७१, ४७७, ४७७(अ), ३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.






























































