
सामना ऑनलाईन । मुंबई
विजेचा वापर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार नवी योजना आणण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार दिवसा विजेचा दर कमी तर रात्री जादा ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसा विजेचा वापर जादा असलेल्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
देशभरात मोठय़ा प्रमाणात सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात असून लवकरच त्यांची एकूण वीजनिर्मिती क्षमता सवा लाख मेगावॅटपर्यंत जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना दिवसा सौरऊर्जा प्रकल्पातून मिळणारी स्वस्त दराची वीज मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल, असे केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी स्पष्ट केले आहे. तर रात्रीच्या वेळेस वापरल्या जाणाऱ्या विजेत सौर प्रकल्पांच्या विजेएवजी इतर प्रकल्पातील विजेचे प्रमाण जास्त असणार आहे. त्यामुळे ती वीज दिवसाच्या विजेच्या तुलनेत महाग असणार आहे. दिवसा आणि रात्री विजेचे भिन्न दर ठेवण्याबाबतचा प्रस्ताव असून तो लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. तसेच ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा म्हणूनही सरकार नवी नियमावली तयार करण्याचा विचार करत आहे. त्यानुसार नैसर्गिक किंवा पुरेशा तांत्रिक कारणाशिवाय वीजपुरवठा खंडित झाल्यास संबंधित वीज कंपनीला दंड ठोठावून त्याचा लाभ परिसरातील ग्राहकांना देण्याचा विचार आहे.
जीर्ण झालेल्या सहा जलविद्युत प्रकल्पांची दुरुस्ती करायची कुणी?
राज्य सरकारची मालकी असलेल्या 467 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेच्या सहा जलविद्युत प्रकल्पांना 35 वर्षांचे वय पूर्ण झाले आहे. त्यामुळे या सर्व प्रकल्पांची दुरुस्ती आणि आधुनिकीकरण तत्काळ करणे गरजेचे आहे, पण ते कोणी आणि कसे करायचे याबाबत चार वर्षे उलटल्यानंतरही सरकारचे निश्चित धोरण ठरलेले नाही. त्यामुळे सदर प्रकल्पांचे काम रखडले असून येथील वीजनिर्मिती कोणत्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता आहे. दुरुस्ती आणि अधुनिकीकरणामुळे या प्रकल्पांची एकूण वीजनिर्मिती क्षमता दहा टक्क्यांनी म्हणजे 45 मेगावॅटने वाढू शकणार आहे.





























































