वीज नियामक आयोगाचा महावितरणला दणका; थकीत वीज बिलावर वार्षिक 16 टक्के व्याज देण्याचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वसामान्य वीज ग्राहकांचे वीज बिल थकल्यास दंडाचा दणका देणाऱया महावितरणलाही महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दंडाचा दणका दिला आहे. ज्या पवन ऊर्जा कंपन्यांकडून वीज खरेदी केल्यानंतरही त्यांना दीड महिन्यात पैसे चुकते केलेले नाहीत, त्यांना तत्काळ वार्षिक 16 टक्के एवढय़ा व्याजदराने बिलाची रक्कम चुकती करण्याचे निर्देश वीज आयोगाने दिले आहेत.

महावितरण आपल्या अपारंपरिक ऊर्जा वापराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पातून वीज खरेदी करण्यासाठी संबंधित कंपन्यांसोबत वीज खरेदी करार केले आहेत. तसेच संबंधित कंपनीने पुरवलेल्या विजेचे बिल पुढील 45 दिवसांत चुकते करण्याची तरतूद आहे. मात्र ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या पवन ऊर्जा निर्मिती करणाऱया कंपनीने मार्च 2017 ते मार्च 2020 या कालावधीत महावितरणला पुरवलेल्या विजेचे तब्बल 1 कोटी 60 लाख रुपये बिल आहे. सदरची रक्कम अद्याप न मिळाल्याने ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने महावितरणविरोधात वीज आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत वीज बिलाच्या थकीत रकमेवर वार्षिक 16 टक्के व्याजासह सर्व रक्कम चुकती करण्याचे निर्देश महावितरणला दिले आहेत.

दोघेही वीज ग्राहकच

सदर प्रकरणावरील सुनावणीदरम्यान महावितरण आणि सर्वसामान्य ग्राहक हे दोघेही वीज खरेदी करणारे ग्राहकच आहेत. त्यामुळे महावितरण जसे वीज बिल थकल्यावर दंड लावते, त्याच नियमाने त्यांनीही थकीत वीज बिलाच्या रकमेवर व्याज मोजायला हवे असेही आयोगाने नमूद केले आहे.