
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी द्रोणागिरी नोड परिसरातील जेएनपीटी वसाहत ते बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत टपऱ्या व चायनीजच्या दुकानावर बुधवार (दि. १७) कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे अनेक स्थानिक प्रकल्पगस्ताच्या उदरनिर्वाहच साधनच मातीमोल झाले आहे.
उरण नवघर, पागोटे ग्रामपंचायत हद्दीत द्रोणागिरी नोड परिसरातील जेएनपीटी वसाहत बस स्थानक ते बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याजवळ टपऱ्या, चायनीजची दुकाने उभारली आहेत. या टपऱ्यांवर,चिकण दुकान व चायनीजच्या दुकानावर सिडकोच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (दि. १७) मोठ्या पोलीस फाट्यासह कारवाईचा बुलडोझर फिरविला आहे. सिडकोच्या धडाकेबाज कारवाईमुळे मात्र येथील टपरीधारक, चायनीजधारकांचं उदरनिर्वाहाचं साधनच मातीमोल झाले आहे. सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी परप्रांतियानी थाटलेल्या द्रोणागिरी नोड परिसरातील भंगार व्यवसायिकांवर कारवाई न करता स्थानिक प्रकल्पगस्त नागरीकांनी थाटलेल्या व्यवसायावर सिडकोची कारवाई का, असा सवाल उपस्थित करून सिडकोच्या अतिक्रमण विभागाने कारवाई थांबवावी, अशी विनंती केली.
सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी रामचंद्र वेटा व शेख मुश्रीफ यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की, सदर टपरीधारक चायनीजधारक व इतर व्यवसायिक यांनी सिडकोच्या जागेवर केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी दोन वर्षांपासून नोटीस बाजावण्यात आल्या होत्या परंतु सदर व्यावसायिकांनी सिडकोच्या जागेवरील अतिक्रमण हटविले नाही. उलट रस्त्यावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नागरीकांच्या वाढत्या तक्रारीनुसार सिडकोच्या अतिक्रमण कारवाई सुरू केली आहे.


























































